आमदार सुरेश धस यांचा पाठपुरावा, 135 प्रकरणात बड्या हस्ती, राजकारण तापणार, 4 जणांना नोटीसा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेमध्ये झालेल्या बोगस गुंठेवारी प्रकरणी विधानपरिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी गुन्हे नोंद करण्याचे व प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह 4 जणांना नोटीस काढली आहे.
गुंठेवारीची मंजुर 1 हजार 413 प्रकरणे तपासण्यात आली त्यात जवळपास 135 प्रकरणात बोगस गुंठेवारी करण्यात आली असुन त्यात अनेक बड्या राजकीय हस्तींचा व लोकांचा समावेश आहे.
गुंठेवारी चुकीच्या पद्धतीने नियम बाह्यरित्या केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे,सेवा निवृत्त अभियंता भारत विधाते व दत्तात्रय कवडे,लिपीक गोरोबा आवचार यांना लेखी नोटीसा दिल्या असुन 7 दिवसात खुलासा सादर करण्याची मुदत दिली आहे. यलगट्टे हे 27 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात धाराशिव जिल्हा कारागृहात असुन त्या घोटाळ्यात अनेक बोगस बिले, प्रमाणके गहाळ आहेत.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस व माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी दिलेल्या 2 वेगवेगळ्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करुन 2 वेगवेगळे अहवाल सादर केले आहेत त्यावर जिल्हाधिकारी यांनी भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 166 व 409 प्रमाणे फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार फड यांनी अंतीम नोटीस बजावली आहे.
गुंठेवारी करताना भुखंडाचे सर्वे नंबर मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसणे, खुली जागा म्हणजे ओपन स्पेस न सोडणेसह वर्ग 2 जमिनीच्या क्षेत्रावर गुंठेवारी करणे, सेवानिवृत्त झाल्यानंतरही गुंठेवारी संचिकावर सही करणे, निश्चित केलेले सुधारित विकास शुल्क न आकरणे असे प्रकार घडले आहेत.नगर परिषदेच्या आरक्षणात गुंठेवारी मंजुर केली आहे.