विधानसभेत मुळ भाजप कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी – सुजितसिंह ठाकुर यांचा पक्षाकडे अहवाल
विधानसभेत मुळ भाजप कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी – सुजितसिंह ठाकुर यांचा पक्षाकडे अहवाल
धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेत कमळ चिन्ह घेऊन न लढण्याने व एकाच घरात दोन पक्ष या घराणेशाहीमुळे पराभव झाला असुन याबाबतचा अहवाल व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मते पक्षश्रेष्टी यांना भेटून सांगितली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण व आत्मचिंतन बैठकीत ठाकुर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. तुळजापूर विधानसभाही जागा भाजपकडे आहे, धाराशिव कळंब विधानसभा जागा भाजपला मिळावी व तिथून भाजपच्या मुळ कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी एकमत असुन त्याबाबत पक्षश्रेष्टी यांना कळविले आहे.
धाराशिव मतदार संघात फारशी ताकत नसलेल्या व कोणतीही पुर्वतयारी नसलेल्या राष्ट्रवादी पवार पक्षाला पक्षाला तिकीट दिल्यामुळेच हा पराभव झाला, भाजपाचे कमळ चिन्ह असते तर लोकसभा जागा गेली नसती असे ठाकुर म्हणाले. एकाच घरात दोन पक्ष हे मतदार व लोकांना न रुचल्याने त्याचाही फटका बसल्याचं सांगत त्यांनी पाटील कुटुंबीयांवर यावेळी टीका केली.
धाराशिव लोकसभा भाजपने लढवावी अशी कार्यकर्ते यांची इच्छा होती, गेल्या काही वर्षात त्यादृष्टीने बुथ रचना, बुथ समिती तयार करुन मतदार यांच्याशी संपर्क अभियान राबविले होते मात्र फारशी ताकत नसलेल्या व पुर्वतयारी न केलेल्या राष्ट्रवादी पक्षाला ही जागा महायुतीच्या जागावाटपात सोडण्यात आली, ही जागा भाजप लढले असते तर विजय झाला असता असे ठाकुर म्हणाले.
पराभवाची कारणे व त्याचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर वरिष्ठ नेत्यांना भेटून दिला आहे, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, सहकार विभागाचे प्रदेश सहसंयोजक दत्ता कुलकर्णी , प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड अनिल काळे, ऍड व्यंकटराव गुंड यांच्यासह भेट घेतली. भाजपमध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्याच्या पत्नी अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादी पक्षात, एकाच घरात दोन पक्ष हे मतदारांना आवडले नाही त्यामुळे त्यामुळे नाकारले असे ठाकुर म्हणाले.
मी आधी पक्ष संघटनेचा कार्यकर्ता आहे, जो संघटनेत काम करेल तो आगामी काळात टिकेल. पक्षाच्या हीताचे निर्णय घेतले जातील, व्यक्ती हिताचा निर्णय घेतला जाणार नाही असे ठाकुर म्हणाले. सर्वांची बांधीलकी संघटनेसाठी असेल, प्रदेश पातळीवर सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. पक्षासाठी जो वेळ देईल तो आपला असे सांगत त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले यावेळी काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त होत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठाकुर सक्रीय झाल्याबद्दल आभार मानत त्यांच्या मनातील व्यथा मांडल्या त्यात मुख्यत्वे महायुतीतील मानपान व कुरघोडी, होणारी कुचंबना, विकास निधी व इतर बाबींचा समावेश होता. काही जणांनी स्वबळाचा नारा देत भाजपच्या चिन्हावर उमेदवार व आमदार हवा असा आग्रह धरला. सत्ता असूनही कामे होईना, सहयोगी पक्षांकडुन होणारी परवड अश्या व्यथा मांडल्या.