दोघांची स्क्रिप्ट एकच – विरोधक आणि मित्रपक्षाची भाषा आमच्या आरोपांना पुष्टी देणारी
धाराशिव – समय सारथी
उबाठाचे आमदार-खासदार यांच्या तोंडी जी भाषा होती त्याच भाषेत आमच्या शिवसेना शिंदे गट मित्र पक्षाचे पदाधिकारीही आता बोलू लागले आहेत त्यामुळे दोघांचीही स्क्रिप्ट एकाच लेखकाने लिहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. पत्रकार परिषद घेणारे आमचे मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि आमचे विरोधक दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी अनेक मुद्द्यांवर दोघांचेही अज्ञान त्यांनी जगजाहीर केले आहे.
पालकमंत्र्यांच्या पत्रानंतरच शहरातील रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली, हे सर्वश्रुत असताना, “स्थगिती फडणवीस सरकारने दिली” असे वारंवार सांगणे, यातूनच विरोधक आणि आमच्या मित्रपक्षाच्या मनातील सुप्त हेतू उघड होत आहे. आम्हीदेखील याप्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे स्वागत यापूर्वीच केले आहे. मात्र या निविदा प्रक्रियेबरोबरच खालील बाबींचीही सखोल चौकशी व्हायला हवी. ज्याबाबत उबाठाचे आमदार-खासदार आणि आमच्या मित्र पक्षातील पदाधिकारी सोयीनुसार मूग गिळून गप्प बसले आहेत.
140 कोटींच्या कामासाठी संभाजीनगरचा ठेकेदार कोणाच्या माध्यमातून आणला गेला ? त्या ठेकेदाराला काम मिळत नाही हे पाहून तत्कालीन मुख्याधिकारी फड यांच्यावर दबाव कोणी आणला ? मुख्याधिकारींना सहा महिने टेंडर उघडू न देण्यासाठी कोणाकडून दबाव टाकण्यात आला ? मुख्याधिकारी दबावाखाली येत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कोणाच्या सांगण्यावर तयार झाला?
गेली नऊ महिने ही प्रक्रिया रखडवण्यासाठी विविध व्यक्तींच्या माध्यमातून अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न कोणी केले ? ज्याला अखेर कंत्राट मिळाले, त्या ठेकेदारासोबत वाटाघाटींसाठी बैठका कोण घेतल्या ?
धाराशिव शहरातील माता-भगिनींनी स्थगितीविरोधात आंदोलन केले, त्यास आमच्या पक्षाने उघड पाठिंबा दिला. त्या आंदोलनात काही भाजप महिला कार्यकर्त्या देखील समर्थनासाठी उपस्थित होत्या, याचा चुकीचा अर्थ लावून आंदोलनकर्त्यां माता-भगिनींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.
आम्ही पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली होती की, या विषयाबाबत आमच्या विरोधकांनी माननीय पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देत त्यांचा गैरसमज निर्माण केला आहे. आज मित्र पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले मुद्दे या सगळ्या बाबींना पुष्टी देणारे आहेत. धाराशिव शहरातील जनतेला न्याय आणि दिलासा मिळेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील.
 
			 
					











