धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात टक्केवारी संस्कृतीचे जनक म्हणून तुमच्या नेत्यांची ओळख जनतेला चांगलीच माहीत आहे. कोणाचा मामा, कोणाचा भाऊ सार्वजनिक बांधकाम, महावितरण, जलसंधारण, भुयारी गटार अशा विभागांतील कामात पार्टनरशीप करतात, थेट कामे करतात,कोण ठेकेदारांवर दबाव आणून स्वतःच्या क्रशरमधून खडी, वाळू घ्यायला लावत हे सर्वश्रुत आहे. इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा तुमच्या नेत्यांना टक्केवारी बाबत जाहीर प्रशस्तीपत्र दिलेलं आहे असा आरोपी अभय इंगळे यांनी केला.
140 कोटींच्या कामांमध्ये टक्केवारी मिळावी म्हणून आंदोलन सुरू झालं, हे आता उघड गुपित राहिलेलं नाही. नगरसेवक असताना तुम्ही केवळ गुत्तेदारी पुरते मर्यादा होता म्हणून प्रशासन, धोरण, निविदा प्रक्रिया याबाबत अज्ञान असणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे नगरविकास विभागाच्या निविदा अधिक दराने मिळणार नाहीत, हे ठरलेलं असतानाही आंदोलनाचा फार्स केला गेला. परंतु सुज्ञ धाराशिवकरांना हे राजकारण कळून चुकलं आहे.
तुमच्या नेत्यांकडे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना निधी आणण्याचं शहाणपण सुचलं नाही. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच राणा दादांना धाराशिवकडे लक्ष द्यावं लागत आहे.राणा दादा तुळजापूरबरोबर धाराशिवच्या विकासासाठी निधी आणतात ते त्यांचं कर्तव्य म्हणून.यामुळे तुमचे नेते उघडे पडले आहेत. त्यांच्या चुका झाकण्यासाठीच हे तुमचं सगळं नाटक, स्टंटबाजी सुरू आहे.
तुम्ही कितीही “स्वच्छतेचा आव” आणला, तरी सिव्हिल हॉस्पिटलसमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तुमचा आणि तुमच्या जवळच्या लोकांचा हिस्सा किती आहे, हे जनतेपासून लपलेलं नाही. दर्जा इतका निकृष्ट की नागरिकांनीच काम बंद पाडलं. आणि आता तुम्हीच गुणवत्ता, विकासावर भाष्य करताय? “सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को!” ही म्हण इथे लागू होते. धाराशिवची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ती तुमचं खऱ्या अर्थाने मूल्यांकन करणार, आणि तुम्हाला योग्य ती जागा दाखवणार, हे निश्चित आहे.