आमदारांच्या संमतीनंतर पक्ष प्रवेश व उमेदवारी – शिवसेनेत नाराजी नाही
ओमराजेंची आमदनी आम्ही केलेल्या विकास कामावर – राणाजगजीतसिंह पाटील
धाराशिव – समय सारथी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः धाराशिव येथे येऊन सांगतील की धाराशिवसाठी काय करायचे आहे. मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व केंद्रातील इतर नेते प्रचाराला येणार असल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. ओमराजे नेहमी म्हणतात की 40 वर्ष काही केले नाही मात्र टीका करणाऱ्या लोकांची आमदानी आम्ही केलेल्या विकास कामामुळे होते. आम्ही सिंचन क्षेत्र वाढवले म्हणून इथे विकास झाला. आता विरोधकांनी स्वतःची चिंता करावी, महायुतीने अर्चना पाटील यांना पूर्ण विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवले आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा आमदार राणा पाटील यांनी उलघडा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र बसून ठरवावे की महायुतीचा उमेदवार कोन असावा? त्यावर आम्ही सर्व नेते शिक्कामोर्तब करू त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील व औसा आणि बार्शी येथील आमदारांनी अर्चना पाटील यांच्या नावाला संमती दिली त्यानंतरच अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला व उमेदवारी जाहीर करण्यात आली. विषय थोडा वेगळा असल्याने केंद्रातील नेत्यापर्यंत अर्चना यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा विषय गेला, राज्यातील व केंद्रातील भाजपणे संमती दिल्यावर अर्चना पाटील यांचा प्रवेश झाला असे आमदार पाटील यांनी सांगितले.
अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी देण्यात आल्यानंतर शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा परत शिवसेनेकडे घ्यावी अन्यथा सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा दिला आहे तसेच अर्चना पाटील यांच्या पक्ष प्रवेश व स्वागत सोहळ्याला पदाधिकारी हजर राहिले नाहीत त्यावर बोलताना आमदार पाटील म्हणाले की शिवसेना शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही, पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले उपस्थितीत होते, राजाभाऊ राऊत, अभिमन्यू पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे हेही होते. उमेदवारी व पक्षप्रवेश सर्वांच्या संमतीने झाला आहे.
देश मोदी यांच्या नेतृत्वात प्रगती करीत आहेत, धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे, झालेला व आगामी काळात करायचा विकास यावर निवडणुक राहिल असे पाटील म्हणाले. गेल्या 20-30 वर्षात पाटबंधारे मंत्री म्हणून काम केले व सिंचन क्षेत्र वाढले त्यामुळेच साखर कारखाना व गुळ पावडर कारखाने असलेला जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख झाली आहे. पाटील कुटुंबाने काम केले आहे हे लोकांना माहिती आहे. महायुतीकडुन निवडणुक लढवीत आहोत, पाणी, सिंचन, रेल्वे यात काम करायचे आहे असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला.