धाराशिव – समय सारथी
भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यात संघटनबांधणीला वेग देत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 17 मंडळांमध्ये तब्बल 1 हजार 20 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय पक्षाच्या भविष्यातील निवडणूक तयारीचा भाग असून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही संघटनात्मक घडामोड पार पडली.
पूर्वीच जाहीर झालेल्या मंडळाध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने पक्षबांधणी अधिक मजबूत होणार आहे. प्रत्येक मंडळात सरासरी 60 पदाधिकारी अशा पद्धतीने कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यात मंडळ चिटणीस, सरचिटणीस, उपाध्यक्ष, मंडळ कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी यांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तयार होत असल्याने, भाजपने ही संघटना रचना वेळेत पूर्ण करून निवडणुकीच्या मैदानात कार्यकर्त्यांसह सज्ज होण्याचे संकेत दिले आहेत. ही कार्यकारिणी निवड म्हणजे केवळ नावांची घोषणा नसून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रचार, जनसंपर्क आणि रणनीती अंमलबजावणीसाठी हा एक भक्कम कणा ठरणार आहे.