धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजप अर्थात महायुतीकडुन राणाजगजीतसिंह पाटील यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली असुन उमेदवारी जाहिर होताच त्यांनी आभार मानले तर कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला. जनतेने दिलेल्या संधीमुळे आणि सहकार्यामुळे मागील ५ वर्षात वेगवान विकास घडला आहे. पुढील ५ वर्षात अधिक वेगाने विकास घडवण्यासाठी आशिर्वाद मिळावा, असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रांताचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. मागील पाच वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून तुळजापूर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या व संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या सोबतीने यंदाही विजय आपलाच असेल असे आमदार पाटील म्हणाले.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघातून उभे राहणार अशी चर्चा होती मात्र त्यांची उमेदवारी पुन्हा तुळजापूर मतदार संघातून जाहिर झाल्याने चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. आमदार राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडुन कोण याची उत्सुकता लागली आहे.
आमदार पाटील हे 2019 मध्ये 23 हजार 169 मतांनी विजयी झाले होते, त्यांनी सलग 4 वेळेस विजय मिळवलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. आमदार राणा यांना 99 हजार 34 तर मधुकरराव चव्हाण यांना 75 हजार 865 मते पडली होती, त्यावेळी 2 लाख 26 हजार 890 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.