परंडा – समय सारथी
गेल्या काही दिवसांपासून परंडा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वन विभागाने अखेर गुरुवारी रात्री कपिलापुरी येथे पकडले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने शेळीला पिंजऱ्यात बांधून ठेवले होते, शेळी शिकार करुन फस्त करण्याच्या नादात बिबट्या आत गेला आणि अलगद अडकला. कपिलापुरी येथील शेतकरी वर्धमान गणपती जैन यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.या बिबट्याने 3 दिवसांत तीन जनावरे फस्त केली होती. या धास्तीने परिसरातील नागरिकांनी रात्री जागून काढल्या. बिबट्या पकडल्याचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याला पाहण्यासाठी सुमारे १५०-२०० जणांचा जमाव जमला होता. परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धाराशिव जिल्ह्यातील इतर भागातही बिबटे, वाघ असल्याचे समोर आले आहे त्यांनाही पकडावे अशी मागणी होत आहे.