धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील बेंबळी या गावाच्या सरपंच वंदना नवनाथ कांबळे यांना घोटाळा करणे भोवले असुन त्यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी रद्द ठरविले आहे. कांबळे यांच्या विरोधात आकाश जगनमित्र मुगळे यांनी तक्रार केली होती त्यानंतर सरपंच पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
कांबळे यांनी निहित कर्तव्य व जबाबदारी यांचे निर्वहन नियमानुसार न केल्यामुळे व त्यांनी केलेल्या अपहारीत रक्कमांची व्याप्ती व त्यांचे विरुध्द दाखल फौजदारी गुन्हयाचे स्वरुप विचारात घेता त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पदाकरिता ग्रामपंचायतच्या उर्वरीत कालावधीसाठी अपात्र घोषीत करण्यात येत आहे असे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत अधिकारी यांनी नियमानुसार रिक्त पदाचा अहवाल सादर करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अनिनियम 1958 मधील कलम 38 मधील तरतुदीनुसार नियमित कामकाज चालविणेसाठी योग्य ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करावा असे आदेश गटविकास अधिकारी आर व्ही चकोर यांनी दिले आहेत.
तत्कालीन विस्तार अधिकारी बच्चेसिंह देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच वंदना नवनाथ कांबळे, ग्रामसेवक ए व्ही आगळे याविरोधात कलम 420, 406,409, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घोटाळ्याप्रकरणी सरपंच कांबळे, ग्रामसेवक ए व्ही आगळे यांच्यासह यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता बी बी शिंदे यांना रक्कम वसुलीची अंतीम नोटीस देऊन संधी दिली होती त्यातील शिंदे यांनी अपहारातील 2 लाख 39 हजार सरकारच्या खात्यात भरले आहेत. कांबळे यांच्याकडे 12 लाख 93 हजार, आगळे यांचेकडे 11 लाख 53 हजार रक्कम न भरल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.
15 वा वित्त आयोग, अंगणवाडी व शाळेसाठी साहित्य खरेदी, ग्रामपंचायतीसाठी साहित्य खरेदी, गावातील कुटुंबाना कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, कीटकनाशके फवारणी यांसह अन्य बाबीत घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले होते. या घोटाळ्याची तक्रार बेंबळी येथील अभयसिंह गावडे, नवाब पठाण, आकाश मुगळे यासह ग्रामपंचायत सदस्यांनी अपहार व घोटाळ्याची तक्रार केली होती तर शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.