धाराशिव – समय सारथी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 54 हजार 212 मतांची आघाडी मिळाली आहे, जिकडे बार्शी तितके सरसी असे सांगत बार्शी आपल्या पाठीमागे असल्याचे महायुतीचे नेते सांगत होते मात्र ओमराजे यांना बार्शीने साथ देत सरशी दिली. माझा नवरा भाजपात आमदार, मी कशाला पक्ष वाढवू हे अर्चना पाटील यांचे बार्शी येथील वक्तव्य राज्यभर गाजले व त्यानंतर मतदारांनी बार्शीत त्यांना नाकारले असल्याचे आकडेवारीवरून दिसते, दिलीप सोपल यांची जादू, भाषणशैली व जनसंपर्क अशी जादू इथे चालली.
अर्चना पाटील यांना 70 हजार 671 तर ओमराजे यांना 1 लाख 24 हजार 883 इतकी मते मिळाली आहेत, बार्शी येथील वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना केवळ 4 हजार 33 इतकी मते मिळाली आहेत. अपक्ष तथा भाजपला पाठिंबा दिलेले आमदार राजाभाऊ राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली मात्र तो फुसका बार ठरला. 2019 विधानसभा निवडणुकीत राऊत यांनी सोपल यांचा 3 हजार 76 मतांनी पराभव केला होता मात्र आता 54 हजार 212 मतांचा फरक चिंताजनक आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला केवळ 906 मतांची आघाडी दिली होती तिथे काटे की टक्कर झाली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 85 हजार 453 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 84 हजार 547 मते मिळाली होती. 906 वरून 2024 ला 54 हजार 212 इतकी आघाडीचा आलेख ओमराजे यांनी बनवला आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदार संघात 65.29 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 21 हजार 270 पैकी 2 लाख 9 हजार 755 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बार्शी मतदार संघात मतमोजणीच्या 24 फेऱ्या/राऊंड झाले.