धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास काही बाबी आणून त्या 154 कोटी निधीचा अध्यादेश तात्काळ काढावा अशी मागणी देखील केली. सभेपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर बॅनरबाजीची बाब मंत्री सावंत यांनी घातली व त्यानंतर जाहीर भाषणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वाभाडे काढले.
धाराशिव शहरात भाजपच्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. विकासाचा वादा फक्त राणा दादा, दिलेला शब्द पाळणारा खरा नेता.आपलं धाराशिव बदलतंय असे म्हणत खड्डे व धुळीच्या संकटातून शहरवासियांची होणार मुक्ती, धाराशिव शहरातील 59 डीपी रस्त्यासाठी 154 कोटी मंजुर केल्याबद्दल शहरवासियांच्या वतीने आमदार राणा दादांचे मनपूर्वक आभार असे बॅनर लावले आहेत.हाच मुद्दा पकडत मंत्री सावंत यांनी आमदार राणा यांच्या बॅनर व श्रेय घेण्याच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त करीत शिवसंकल्प अभियानातील भाषणातून जाहीर टीका केली.
मुख्यमंत्री यांनी 20 ऑक्टोबर 23 रोजी धाराशिव शहरासाठी 154 कोटी मंजुर केले त्याचा अद्यादेश येत्या 2 दिवसात निघेल. मी यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांना आग्रह धारित पत्र दिले, शिवसैनिक रात्र दिवस शहरात मेहनत घेत आहेत मात्र अचानक धाराशिव शहरात बॅनर लागले की 154 कोटी आणल्याबद्दल अभिनंदन, अजुन जीआर निघाला नाही कसले अभिनंदन याचे मला आश्चर्य वाटते, असे सांगत मंत्री सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली.
विशेष म्हणजे आमदार पाटील यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर कुठेही नगर परिषदेचा टॅक्स कर भरलेला क्यूआर कोड नाही आणि शिवाय ज्या ठिकाणी बॅनर लावले त्यातील काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे,अन तिथेच आपलं धाराशिव बदलतंय अशी बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे.