धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात आर्थिक घोटाळ्याचा वेगळा प्रकार समोर आला आहे. वसंतदादा बँकेत चेअरमन विजय दंडनाईक यांनी काही कर्जदारांच्या नावे नियमबाह्यरित्या करोडोचे कर्ज काढले आणि ती रक्कम त्याच दिवशी स्वतःच्या खात्यात घेत हडप केली. त्या कर्जदार यांचे कर्ज न भरता ठेवीदार यांची फसवणूक करुन वसंतदादा बँक बंद पाडली. काही कर्जदार हे या घोटाळ्यात कागदोपत्री ‘पिडीत’ आहेत.
वसंतदादा बँकेत ज्यांच्या नावे बोगस कर्ज उचलली त्यातील काही जण दंडनाईक यांचे सुपुत्र चेअरमन रोहित दंडनाईक यांच्या अरविंद नागरी पतसंस्थेत संचालक रूपात ‘लाभार्थी’ असल्याचे समोर आले आहे. एका घोटाळ्यात ते कागदोपत्री ‘पीडित’ आहेत तर दुसऱ्या घोटाळ्यात तेच लोक ‘लाभार्थी’ असल्याने हा संघटित आर्थिक गुन्हेगारीचा प्रकार समोर आला आहे.
अरविंद पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये ठेवीदार यांची मुदत संपूनही रक्कम परत न दिल्याचा आकडा 2 कोटीपेक्षा जास्त नमूद आहे तर अरविंद पतसंस्थेतील पोलिसांच्या प्राथमिक तपासात केवळ 7 ते 8 ठेवीदार यांचा फसवणूकीचा आकडा 3 कोटीच्या पुढे गेला आहे त्यामुळे ऑडिट व इतर कागदपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन सदस्य, सभासद संख्या व काही व्यवहार संशयास्पद आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी वसंतदादा बँकेच्या संशयित मोठ्या १८ कर्जदारांना चौकशीसाठी हजर राहण्याचे कळविले असून संबंधितांना नोटीस बजावली आहे त्यामुळे ‘इकडे आड तर तिकडे विहीर’ अशी स्तिथी झाली आहे. वसंतदादा बँकेच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या असुन कारखाना, पतसंस्था, बचत गट, बोगस फर्म व इतर माध्यमातून केलेल्या आर्थिक लुटीचे समीकरण व शृंखला जुळली आहे.
वसंतदादा बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ गुन्हा नोंद झाल्यापासून पोलिसांना चकवा देत फरार राहण्यात यशस्वी झाले असुन त्यातील काही जणांची जामीन उच्च न्यायालयाने फेटाळली आहे, यातील काही जणांच्या अर्जावर 4 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी आहे.
अरविंद पतसंस्थाचे चेअरमन रोहित दंडनाईक याला अंतीम सुनावणीपर्यंत दिलासा असुन मंगळवारी जिल्हा कोर्टात अटकपुर्व जामीनावर सुनावणी होणार आहे. दंडनाईक यांची ऍड मिलींद पाटील तर सरकारी पक्षाची बाजु जिल्हा सरकारी वकील ऍड शरद जाधवर मांडत आहेत.
चेअरमन रोहित दंडनाईक यांच्या वतीने वकिलांनी कोर्टात ३ ठेवीदार यांच्या मुदत ठेवीच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम कोर्टात भरली असुन फसवणूकीचा आकडा वाढला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड करीत आहेत. फसवणुकीचे हे प्रकरण केवळ ३ तक्रारदार यांच्या पुरते मर्यादित नसून अनेक ठेवीदार यांचे मुदत ठेवीचे पैसे दिलेले नाहीत.
अरविंद पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम ८८ नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे. पतसंस्था स्थापन झालेल्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत त्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत.
बँका बुडविण्याचा दंडनाईक पॅटर्न यानिमित्ताने समोर आला असुन या परिवारावर यापूर्वी फसवणूकीचे व इतर फौजदारी गुन्हे व दिवाणी खटले नोंद आहेत.