तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे व अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार फरार
धाराशिव – समय सारथी
27 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना दिलासा मिळाला नसुन त्यांचा जामीन अर्ज धाराशिव कोर्टातील न्यायाधीश व्ही जी मोहीते यांनी फेटाळला असल्याने त्यांचा धाराशिव जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. उच्च न्यायालयात जामीन अर्ज करणार असुन तोपर्यंत जेलमध्ये राहावे लागणार आहे तर तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे व अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार फरार आहेत.
विविध विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गहाळ करुन अपहार केल्याचा आरोप आहे तर बायोमायनिंग व बोगस गुंठेवारी प्रकरणाची टांगती तलवार आहे.
6 जुलै 2020 ते 21 नोव्हेंबर 2022 या 28 महिन्यात 27 कोटी 34 लाख रुपयांच्या विकास कामाच्या बिलात अपहार झाला असुन तो दडवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांनी संगनमत केल्याची तक्रार नगर परिषदेने दिली असुन कलम 420,409,201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहार, फसवणूक, पुरावा नष्ट करणेसह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेतील तक्रारी अनुषंगाने चौकशीची मागणी केली होती याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली त्यात करोडो रुपयांची प्रमाणके गायब असल्याचे समोर आले.
चौकशी समितीच्या अहवालानुसार 1 हजार 88 प्रमाणके गायब होती त्यात शासकीय देयके, विद्युत देयके, शासकीय कर, लाभार्थी, जाहिरात, वेतन मानधन व इतर कर असे शासकीय खर्च केलेले 574 देयके आणि ठेकेदार, विकास योजना व किरकोळ खर्चाची 514 देयके अशी वर्गवारी करून अहवाल सादर करण्यात आला, यातील अनेक देयके गायब आहेत तर कामे निकृष्ट आहेत.