धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 9 जणांनी धाराशिव येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले असुन त्यात न्यायालयीन कोठडीत म्हणजे जेलमध्ये असलेल्या 7 जणांनी नियमित तर 2 जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत, तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी सावध भुमिका घेत माघार घेतली आहे. यातील काही अर्जावर 9 एप्रिल, 10, 11 व 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे. पिनू तेलंग याला अटकपुर्व जामीन अर्जावर अंतीम सुनावणी पर्यंत तात्पुरता दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे त्यामुळे नियमित सुनावणी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख हे सरकार व पोलिसांच्या वतीने म्हणणे सादर करतील त्यानंतर यावर निर्णय होणार आहे. 35 पैकी 21 आरोपी फरार असुन 14 धाराशिव कारागृहात आहेत.
धाराशिव जेलमध्ये असलेली महिला ड्रग्ज तस्कर संगीता गोळे, मुंबईतील तस्कर संतोष खोत यांच्या नियमित जामीन अर्जावर तर फरार आरोपी वैभव गोळे याच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 10 एप्रिलला सुनावणी होणार आहे. ड्रग्ज तस्करीत सुरुवातीला 15 फेब्रुवारीला अटक केलेले आरोपी युवराज दळवी, अमित अरगडे यांच्यासह संकेत अनिल शिंदे या जेलमधील 3 जणांच्या नियमित अर्जावर 9 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तर स्वराज उर्फ पिनू तेलंग याच्या व इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर याच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. संदीप राठोड याच्या अर्जावर 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आरोपीचे वकीलपत्र मिळवण्यासाठी स्पर्धा लागली असुन काही जणाकडुन मॅनेजमेंटचे वेगवेगळे दावे व फंडे वापरत प्रलोभने दिली जात असल्याची आरोपीत चर्चा आहे.

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी जवळपास 80 जणांना नोटीसा पाठवण्यात आल्या असुन त्यांचे जबाब नोंदविणे झाले आहे, त्यावर निर्णयाची प्रक्रिया सुरु आहे. यात काही साक्षीदार तर काही जन आरोपी होणार असल्याचे कळते.