धाराशिव – समय सारथी
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणी चेअरमन रोहितराज विजय दंडनाईक यांना मोठा दिलासा मिळाला असुन कोर्टाने अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. जामीन अर्जावर 2 डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यावर न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी नियमित जामीन मंजुर केला आहे.
कोर्टाने काही अटीवर जामीन मंजुर केला असुन त्या अटी सविस्तर आदेशात देण्यात आल्या आहेत.तब्बल दीड महिन्यापासुन तारीख पे तारीख असा सिलसिला सुरु होता तर संचालक संजय बोंदर यांच्या अटकपुर्व जमिनावर 4 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सविस्तर जामीन आदेश बाहेर आल्यानंतर फसवणूक झालेले काही तक्रारदार त्यांची कायदेशीर भुमिका स्पष्ट करणार आहेत.
अरविंद घोटाळ्यात पोलिसात 10 लाखांचा प्राथमिक गुन्हा नोंद असुन त्यातील 50 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली आहे मात्र तपासात घोटाळ्याचा आकडा हा जवळपास 3 कोटी 50 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे त्यावर कोर्टाने काय निरीक्षण नोंदवित आदेश केला हे अद्याप समोर आले नाही. सरकारतर्फे शासकीय अभियोकता ऍड शरद जाधवर व आरोपीचे वकील ऍड मिलींद पाटील यांनी बाजु मांडली तर उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड हे तपास करीत आहेत.
अरविंद पतसंस्था घोटाळ्यात 1 सप्टेंबर 23 रोजी गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
विजय दंडनाईक यांच्या जामीनावर सोमवारी सुनावणी
वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक व सर्व 16 संचालक फरार आहेत. जिल्हा, उच्च न्यायालयाने जामीन नाकारूनही पोलिस अटक करीत नसल्याने कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वसंतदादा व अरविंद यांच्या डजनभर फरार संचालकपैकी एकालाही पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. सर्वजण कागदोपत्री फरार आहेत.
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणात तत्कालीन चेअरमन विजयकुमार दंडनाईक यांच्या जामीन अर्जावर 4 डिसेंबर सोमवारी तर व्यवस्थापक दीपक देवकते व संचालक हरिश्चंद्र शेळके यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 6 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.