धाराशिव – समय सारथी कळंब तालुक्यातील श्री दत्तमंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरचे तथाकथीत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना फसवणूकीच्या गुन्ह्यात मोठा दिलासा मिळाला असुन छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांची जामीन मंजूर केली असल्याची माहिती ऍड रवींद्र मैंदाड यांनी दिली. जामीन मंजुर झाल्यानंतर त्यांची धाराशिव कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे, ते तब्बल 1 महिना जेलमध्ये होते. चार्जशीट पाठवे पर्यंत त्यांना दर शुक्रवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अट घातली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाची बनावट कागदपत्रे व बनावट शिक्के वापरून विकास कामाचा प्रस्ताव करुन शासनाला एक कोटी दहा लाख निधीचा गंडा घातल्याच्या प्रकरणात पोलिसांनी लोमटे महाराज यांना अटक केली होती तसेच एका भाविक महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने अटक केली होती या दोन्ही प्रकरणात त्यांना जामीन मंजुर झाला आहे.
मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांनी जुन्याच झालेल्या कामावर नव्याने एक कोटी निधी आणल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतने हा निधी रद्द करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीला पत्र देवुन निधी रद्द केला होता. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी टी जे जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच,रुक्मिणी आगतराव घोळवे व ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांच्यावर बनावट कागदपत्र,सही,शिक्के,बनावट ठराव तयार केल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
एका भाविक महिलेच्या तक्रारीवरून लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम 376, 354, 354 अ, 354 सी, 341, 323, 504, 506, 509, आयटी कायदा कलम 66 ई, 67, 67 अ तसेच जादूटोणा कायदा कलम 2(1) प्रमाणे विनयभंग व बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता त्या प्रकरणात ॲड रवींद्र मैंदाड यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन जामीन मंजूर केली. सदर प्रकरणात युक्तिवाद कामी ॲड श्रीकांत माळी, ॲड आकांक्षा माने, ॲड राम राऊत यांनी सहकार्य केले.