धाराशिव – समय सारथी
आळणी येथील ग्रामपंचायत अंतर्गत कथित बोगस शौचालय बांधकाम प्रकरणात माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांना जिल्हा न्यायालय, धाराशिव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ऍड किरण चादरे यांनी मांडलेली बाजु व युक्तिवाद ऐकून कोर्टाने जामीन मंजुर केला.
सन 2015-16 मध्ये शासनाच्या शौचालय बांधकाम योजनेअंतर्गत बनावट ग्रामपंचायत 8-अ उतारे तयार करून, एकाच कुटुंबातील पाच जणांना अनुचितरित्या लाभ दिला व प्रत्येकी 12,000 रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकांवर करण्यात आला होता. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धाराशिव यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार 18 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन, धाराशिव यांनी गु.र.नं. 244/2025 नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम 316(5), 318(4), 336(3), 338, 340(2) अंतर्गत बनावट कागदपत्रे व फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला.
सदर गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी अॅड किरण चादरे व अॅड अजिंक्य मगर यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान अॅड चादरे यांनी मांडलेला युक्तिवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हा न्यायालय, धाराशिव यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात अॅड. किरण चादरे यांना अॅड अजिंक्य मगर, अॅड वेदकुमार शेलार व अॅड चव्हाण यांचे सहकार्य लाभले.











