धाराशिव – समय सारथी
बहुचर्चित वसंतदादा बँकेच्या करोडो रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार असलेले चेअरमन विजय दंडनाईक यांनी अखेर धाराशिव येथील कोर्टात अटकपुर्व जामीनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 5 ऑक्टोबर रोजी गुरुवारी न्यायाधीश बागे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने फिर्यादी, तपास अधिकारी व सरकारी वकील यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढली आहे. याच कोर्टाने इतर 6 संचालक यांची अटकपूर्व जामीन फेटाळली होती त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळली आहे.
दंडनाईक हे 28 जुलै रोजी गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत फरार राहण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस व आर्थिक गुन्हे शाखा अश्या दोन्ही यंत्रणाना ते चकवा देत असुन पोलिसांची पथक पुणे व इतर ठिकाणी धडकून आली आहेत.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असुन त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ करीत आहेत. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे गुन्हा नोंद केला आहे.
घोटाळ्यातील फरार आरोपी पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी व कमलाकर आकोसकर या 6 जणांचा अटकपूर्व जामीन छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला असुन या सर्वांच्या आर्थिक घोटाळ्यातील सहभागावर कडक ताशेरे ओढले आहेत तर काही संचालक यांनी अटकपुर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला असुन त्यावर 4 ऑक्टोबर बुधवारी सुनावणी होणार आहे.
वसंतदादा बँकेत ओव्हर ड्राफ्ट, स्वयं रोजगार कर्ज असे बोगस कर्जवाटप करुन करोडो रुपयांची रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांनी त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर घेतली व नंतर ती जयलक्ष्मी साखर कारखान्यात गुंतवणूक केली. त्या कारखान्यात दंडनाईक यांची मुले, पत्नी असा परिवार आहे. सुरेखा दंडनाईक यांच्या बचत गटाला नियमबाह्य कर्ज दिले असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
वसंतदादा बँकेतून संशयित स्वयंरोजगार कर्ज, बचत गटाला कर्ज व ओव्हर ड्राफ्ट देताना संचालक मंडळाने कोणतीही कागदपत्रे न घेता मंजुरीचा ठराव घेऊन तात्काळ मान्यता दिली, कर्जवसुल होणार नसल्याचे ज्ञात असतानाही ते वाटप केले आणि जाणीवपूर्वक वसुलीसाठी पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांचा या घोटाळ्यातील चेअरमन व संचालक यांचा सहभाग तपासात अधोरेखित झाला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की 6 जणांच्या नावे प्रत्येकी 60 लाख रुपयांचा असे 3 कोटी 60 लाख रुपयांचे ओव्हर ड्राफ्ट 12 डिसेंबर 2011 ते 1 जुन 2012 दरम्यान मंजुर केले व त्याच दिवशी ती रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांच्या बचत खात्यात जमा केली. याचं लोकांना प्रत्येकी 55 लाख रुपयांचे स्वयं रोजगार कर्ज मंजुर केले व ते ओव्हर ड्राफ्टमध्ये जमा केले, हे कृत्य आर्थिक अपहार असुन चेअरमन व संचालकांचा यात थेट संबंध आहे.
संचालक असलेले गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक अर्थात सीए असलेले भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे फरार असुन पोलिसांचा तपास सुरु आहे.
दंडनाईक परिवाराची संघटीत आर्थिक गुन्हेगारी
चेअरमन विजय दंडनाईक व त्यांच्या परिवाराने वसंतदादा बँक व अरविंद नागरी पतसंस्था अश्या 2 बँका, दूध संघ यांच्यासह जय लक्ष्मी साखर कारखाना बुडविला असुन त्यातून शेतकरी व ठेवीदारांना करोडोचा गंडा घातला आहे. कुटुंबातील पती-पत्नी, दोन्ही मुलांवर गुन्हा नोंद आहे. बँका व ठेवीदार असलेल्या लोकांना बुडविन्याचा उद्योग उघड झाला असुन या परिवारावर आर्थिक फसवणूकीचे अनेक गुन्हे यापुर्वी देखील नोंद आहेत. संघटित आर्थिक गुन्हेगारीचा हा एक प्रकार असुन त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे.