धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात फरार आरोपी इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याच्या अटकपुर्व जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी पोलिस यंत्रणा व तपासावर गंभीर आरोप करण्यात आले. मिटू ठाकुर याने पोलिसांविरोधात आवाज उठवला, पोलिस करीत असलेल्या चुकीच्या, बेकायदेशीर कृत्याची वारंवार पोलखोल केली, त्यामुळे अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी याचे निलंबन व इतर कारवाई झाली. नळदुर्ग भागात तस्करीसह अवैध धंदे ठाकुर याने बंद पाडले, वेळोवेळी निवेदन दिले, या सामाजिक कार्यामुळे पोलिसांनी आकस ठेवते त्याला नेहमी टार्गेट केले. ठाकुर याला पोलिसांनी यापुर्वी देखील खोट्या गुन्ह्यात अडकवले व आता सुद्धा पुरावा नसताना त्याला ड्रग्ज तस्करीत गुंतवले असा आरोप वकिलांनी कोर्टात केला. ठाकुर याच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, ज्याची गाडी ड्रग्ज तस्करीत जप्त झाली त्या मालकाला आरोपी न करता, संबंध नसताना ठाकुर याला पोलिसांनी आरोपी केले, त्यामुळे त्याला अटकपुर्व जामीन द्यावा अशी बाजु ठाकुर याच्या वतीने ऍड अमोल वरुडकर यांनी कोर्टात मांडली. 21 एप्रिल रोजी सोमवारी पुन्हा यावर उर्वरित युक्तिवाद करण्यात येणार असुन सरकार पक्ष त्यानंतर बाजु मांडणार आहे. कोर्टात आरोप प्रत्यरोपाचा सामना पहायला मिळत आहे.
इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची जंत्री व इतर मुद्यावर युक्तिवाद करण्यात आला. ठाकुर याच्यामुळे पांचाळ नावांच्या एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन झाले, असा दावा कोर्टात करण्यात आला. पोलिसांनी त्याला अनेक गुन्ह्यात अडकवले त्यात दरोडासह अन्य गुन्हे होते. नळदुर्ग मार्गे अनेक अवैध धंदे चालतात त्याला ठाकुर हा अडथळा ठरत असल्याने पोलिसांनी त्याला ड्रग्जच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला, ठाकुर याने पोलिसांच्या विरोधात दिलेले अर्ज व इतर कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आली.
एका फरार आरोपीला गंभीर व दुर्धर आजार असल्याने आणि अनेक मुद्याच्या आधारे त्याला जामीन द्यावा अशी विनंती कोर्टात करण्यात आली. पोलिसांनी पकडलेले ड्रग्ज हे नॉन कमर्शियल श्रेणितील असुन पोलिस जाणीवपूर्वक 3 वेळेस जप्त ड्रग्जची एकत्रीत मात्रा वाढवली आहे. पुरावे नसताना पोलीस आरोपीना गुंतवण्याचा प्रयत्न करीत असुन चार्जशीट दाखल झाले आहे, मुख्य आरोपी अटकेत आहे. पोलिसाचा तपास झाला आहे त्यामुळे आरोपीला अटक करुन त्याच्या कस्टडीची गरज नाही. काही निर्दोष लोकांना यात चुकीच्या पद्धतीने गुंतवण्यात आले असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. जामीन दिली तर सहकार्य करू अटी पाळू, कारागृहात जेलमध्ये आजारावर उपचार मिळणार नाहीत असे सांगत ऍड विशाल साखरे यांनी सर्वोच्च, उच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयाचा दाखला कोर्टात दिला.
फरार आरोपीला चार्जशीट फायदा मिळू शकत नाही, जे आरोपी अटक केले त्या अनुषंगाने तपास करुन चार्जशीट म्हणजे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फरार आरोपीबाबत सविस्तर तपास झालेला नाही, तो बाकी आहे. गंभीर आजार हे जामीन देण्याचे कारण असु शकत नाही, आरोपीचे मुंबई येथील तस्कर संगीता गोळे, वैभव गोळे व संतोष खोत याच्याशी थेट संबंध, आर्थिक व्यवहाराचे पुरावे सापडले असुन चार्जशीट दाखल म्हणजे जामीन द्यावी असे नाही. आर्थिक फायद्यासाठी आरोपी गेली 3 ते 4 वर्षापासुन तुळजापूर येथे ड्रग्ज विक्री करीत होता. गंभीर आजार गुन्हा करण्याची परवानगी/लायसेन्स देतो का असा प्रश्न उपस्थितीत करीत जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी विरोध केला. मिटू ठाकुर याच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यावर सरकार पक्षाच्या वतीने ऍड देशमुख बाजु मांडणार आहेत.
फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग यांच्या अर्जावरील युक्तिवाद संपला असुन कोर्ट 21 एप्रिल रोजी सोमवारी यावर निर्णय देणार आहे तर इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याच्या अर्जावर 21 एप्रिल सोमवारी उर्वरित युक्तिवाद केला जाणार आहे. धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे याच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.