धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन यातील महंत चिलोजीबुवा हे फरार आहे. महंत चिलोजी बुवा यांनी अटकपुर्व जामीनीसाठी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर 6 जानेवारी रोजी तपास अधिकारी व सरकारी वकील यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर केले असुन पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन एसआयटी पथक याचा तपास करीत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख व त्यांचे पथक तपास करीत आहे
महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजी बुवा,चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा,वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा सहायक या चार महंतासह मयत धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व अज्ञात अश्या 7 आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व आरोपी फरार आहेत. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत अलंकार व दागिने गायब प्रकरणी दोषीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थितीत केला होता त्यावर उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले, जिल्हाधिकारी यांनी आदेश व तक्रार देऊनही गुन्हा नोंद होत झाला नसल्याचे सांगितले तसेच हिवाळी अधिवेशन संपण्यापुर्वी गुन्हे नोंद करण्याचे शासनास सांगितले त्यानंतर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या 16 सदस्य असलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीत चांदीचा मुकुट, त्रिशूल, प्रभावळ, धुपारती यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब असल्याचे समोर आले होते त्यानंतर तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंद केला गेला.