धाराशिव – समय सारथी
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे ओमराजे निंबाळकर यांना 34 हजार 966 मतांची विक्रमी आघाडी मिळाली आहे. लोकसभेची मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अर्चना पाटील यांना औसा विधानसभा मतदार संघात 67 हजार 282 तर ओमराजे यांना 1 लाख 2 हजार 248 इतकी मते मिळाली. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 5 हजार 346 मते पडली.
औसा मतदार संघात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र त्यांच्यासह माजी आमदार बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाला जनतेने स्पष्ट नाकारले असल्याचे आकडेवारीवरून दिसते. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत अभिमन्यू पवार यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले उमेदवार बसवराज पाटील यांचा 26 हजार 714 मतांनी पराभव केला होता, आता मात्र बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला तरी देखील ओमराजे यांना 34 हजार 966 मतांची आघाडी मिळाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 53 हजार 504 मतांची आघाडी दिली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 5 हजार 189 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 51 हजार 685 मते मिळाली होती. औसा येथे 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये आघाडी 18 हजार 538 ने कमी झाली आहे.
औसा विधानसभा मतदार संघात 64.44 टक्के मतदान झाले असुन 2 लाख 94 हजार 086 पैकी 1 लाख 89 हजार 515 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. औसा मतदार संघात मतमोजणीच्या 22 फेऱ्या/राऊंड झाले.