धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गाडीवर पेट्रोल, अंडे व दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पोलिसांना घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले असुन तपासाला सुरुवात केली आहे, गाडीवर अंडे व पेट्रोलचे फुगे मारून गाडी थांबवत जाळून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागे कोण याचा शोध सुरु आहे दरम्यान समय सूचकतेमुळे सरपंच या हल्ल्यातून बचावले. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची शक्यता आहे, तसा आरोप सरपंच यांनी केला आहे. मी रात्री तुळजापुरवरुन जवळग्याला परतत होतो. त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन बाईक आल्या. बाईकस्वार सतत हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असे आम्हाला वाटले आणि आम्ही गाडी रस्ताच्या मधोमध आणून स्लो केली. आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला. डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो. त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली. अंडी फेकल्यामुळे समोरचं काही दिसेनासे झाले. त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली. त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, असे नामदेव निकम यांनी म्हटले. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा, असा माझा संशय आहे. असे सुरु राहिल्यास आम्ही काम कसे करणार ? मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरे होईल, असे नामदेव निकम यांनी सांगितले.