धाराशिव – समय सारथी
शिंदे सेनेत प्रवेश का करत नाहीस, असे म्हणत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाणीत प्रशांत साळुंके जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संभाजीनगर काकडे प्लॉट येथे ही घटना घडली.
प्रशांत साळुंके हे 23 मे रोजी दुपारी घरुन स्कुटीवरुन तहसील कार्यालयाकडे जात होते. संभाजीनगर काकडे प्लॉट येथे सुदर्शन उर्फ विशाल अण्णा गाढवे (रा.वरुडा), विनोद उर्फ अमोल विलास जाधव (रा.नारायण कॉलनी धाराशिव) व इतर दोघा अनोळखी व्यक्तींनी साळुंके यांना अडविले. तुला सुधीर अण्णा पाटील यांनी दिलेला निरोप समजला नाही का? असे म्हणत संदेश जाधव याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदार का झालास? तुला माज आला आहे का? तुला खल्लास करुन टाकू असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा साळुंके यांनी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे असे म्हणताच विनोद जाधव याने साळुंके यांच्या गच्चीला धरुन मारहाण केली. सुदर्शन उर्फ विशाल गाढवे याने लोखंडी रॉडने पायावर जबर मारहाण केली. तेव्हा साळुंके हे खाली कोसळले.
मारेकर्यांनी आणखी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी साळुंके यांनी आरडाओरड केल्यानंतर दत्ता सोकांडे, युवराज राठोड व इतर मुले मदतीसाठी धावून आले. त्यानंतर मारेकरी पळून गेले. जात असताना आता तर वाचलास यानंतर तुला जिवंत ठेवणार नाही. शिंदे गटात प्रवेश केला तर तुला जगू देऊ अशी पुन्हा धमकी दिली. घटनेनंतर दत्ता सोकांडे व इतर जणांनी साळुंके यांना आनंदनगर पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा उजव्या पायास मार लागून त्रास होत असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान साळुंके यांनी दिलेल्या जबाबावरुन चौघाजणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.