वाशी – समय सारथी, शोएब काझी
धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असुन रोजगार हमीच्या शासकीय कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. रवी राख व कृष्णा बांगर अशी त्यांची नावे असुन ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रोजगार हमीच्या बिलावरून हा हल्ला झाल्याची व हल्ला करणारे बीड येथील राजकीय नेत्यांच्या संबंधित कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया व तपास सूरू आहे.
दोघे कर्मचारी काम आटोपून बोलेरो गाडीतून घराकडे निघाले होते. या दरम्यान काही अंतर दूर गेल्यानंतर इट आंदरूड रस्त्यावर बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांची गाडी रोखली होती. गाडी रोखल्यानंतर अज्ञातांनी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडायला लावताच दोघांना बाहेर ओढून काढत लाठ्या काठ्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर रवी राख व कृष्णा बांगर हे दोन्ही शासकीय कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. यातील एका शासकीय कर्मचाऱ्याला बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते.