तक्रार,चौकशी,वसुली,राजकीय आरोप प्रत्यारोपाने घोटाळा गाजला
धाराशिव – समय सारथी
बहुचर्चित बेंबळी ग्रामपंचायत येथील अपहार प्रकरणात ग्रामसेवक आगळे यांना बेंबळी पोलिसांनी अटक केली असुन त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून ते अनेक दिवस फरार होते तर अन्य घोटाळ्यात त्यांचा सहभाग आहे.
तक्रार,चौकशी,कागदपत्रे गायब,प्रशासकीय दिरंगाई,अपहार वसुली,राजकीय आरोप प्रत्यारोप व घडामोडीने घोटाळा चांगलाच गाजला.दैनिक समय सारथीने या घोटाळ्याचा पाठपुरावा केला होता.
विस्तार अधिकारी बच्चेसिंह देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामसेवक ए व्ही आगळे याविरोधात कलम 420, 406,409, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बेंबळी येथील घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवक ए व्ही आगळे यांना रक्कम वसुलीची अंतीम नोटीस देऊन संधी दिली होती मात्र त्यांनी पैसे भरले नाहीत. आगळे यांचेकडे 11 लाख 53 हजार रक्कम न भरल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असुन सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे तपास करीत आहेत.
15 वा वित्त आयोग, अंगणवाडी व शाळेसाठी साहित्य खरेदी, ग्रामपंचायतीसाठी साहित्य खरेदी, गावातील कुटुंबाना कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, कीटकनाशके फवारणी यांसह अन्य बाबीत घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले.
या घोटाळ्याची तक्रार बेंबळी येथील अभयसिंह गावडे, नवाब पठाण, आकाश मुगळे यासह ग्रामपंचायत सदस्यांनी अपहार व घोटाळ्याची तक्रार केली होती तर शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.