धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वत्र टीका होत असताना जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी प्रतिकिया दिली आहे. अनुभव, कार्यक्षमता व बांधिलकी हे अर्चना ताई पाटील यांच्या उमेदवारीचे निकष आहेत. मुख्यमंत्री यांनी सुद्धा या सगळ्या बाबींना संमती दिली असुन त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत.
तेर गटात जया नाईकवाडी यांनी माघार घेतल्यानंतर अर्चना पाटील यांना भाजपकडुन उमेदवारी मिळाली आहे. लढणार व जिंकणार.. लागा तयारीला असे म्हणत कार्यकर्ते यांनी उमेदवारीचे स्वागत करीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘माऊली’ असे म्हणत त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे दावेदार म्हणुन भाजपकडुन लॉन्च केले जात आहे.
सौ अर्चनाताई पाटील या केवळ आमदारांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिलेल्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात, त्यासह अन्य निकषावर त्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. अर्चना पाटील यांनी अनेक वर्षे सातत्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी दोन वेळा जबाबदारी समर्थपणे पार पाडली असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची धुरा देखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि जनतेशी असलेल्या बांधिलकीची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी दिली आहे.












