धाराशिव – समय सारथी
अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले असुन आज दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई येथे प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष सोहळा संपन्न होणार आहे. दैनिक समय सारथीने अर्चना पाटील यांच्या प्रवेशाची बातमी सर्वप्रथम केली होती.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांची भेट घेतली, धाराशिव लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला असुन अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशासोबतच उमेदवारी जाहीर होणार आहे.
धाराशिव येथे रंगणार पाटील निंबाळकर असा लोकसभेचा सामना रंगणार असुन परंपरागत लढत होणार आहे. महायुतीकडून अर्चना पाटील तर महाविकास आघाडीकडुन ओमराजे निंबाळकर असा सामना रंगणार आहे.
धाराशिवच्या लोकसभेच्या इतिहासात 1991 साली विमल मुंदडा, 2004 साली माजी खासदार कल्पना नरहिरे नंतर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. कल्पना नरहिरे यांचा 1,649 मतांनी विजय झाला होता तर मुंदडा ह्या 83,055 मतांनी पराभूत झाल्या.
सौ अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा असुन धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटन, दांडिया महोत्सव, नवरात्र यासह अन्य महिलांचे कार्यक्रम आयोजन केले आहे.
धाराशिव लोकसभेत 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असुन त्यात 9 लाख 46 हजार 54 मतदार ह्या महिला असुन 10 लाख 58 हजार पुरुष मतदार आहेत. महिला उमेदवार आल्यास महिला मतदारांचे मत निर्णायक ठरू शकते.