धाराशिव – समय सारथी
तुळजापूर, परंडासह धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करीबाबत पोलिसांनी काय कारवाई केली व सध्य स्थिती यावर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी क्रमांक 2,366 हा उपस्थितीत केला होता. लक्षवेधीवर राज्य सरकारने पटलावर उत्तर देण्याआधी ते उत्तर तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे यांनी ‘पत्रकार ग्रुप, तुळजापुर’ या सोशल मीडिया व्हाट्स ऍप ग्रुपसह अन्य ठिकाणी व्हायरल केले. पोलिस अधीक्षक यांनी राज्याचे महासंचालक व गृह विभागाचे कक्ष अधिकारी अविनाश आगळे यांना 19 मार्चला पाठवलेला 27 पानाचा अहवाल भातलवंडे यांनी 20 मार्चला सकाळी 9.30 ला ‘लीक’ केला. हा अहवाल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासाठी पोलिस विभागातील एकाने गोपनीयरित्या पाठवला होता मात्र तो त्यांच्याच पीएने लीक करीत भांडाफोड केला. भातलवंडे यांना अहवाल कोणी पाठवला व हेतू काय ? हा प्रश्न उपस्थित करीत आमदार कैलास पाटील यांनी काही पुरावे तक्रारीसोबत दिले आहेत. भातलवंडे यांनी उत्तर ‘लीक’ केले व त्यानंतर भातलवंडे यांच्या निदर्शनास आणुन दिल्यावर त्यांनी ते चुकून व्हायरल झाल्याचे मान्य करत ते 11 च्या सुमारास ग्रुपवरून डिलिट केले.

ड्रग्ज प्रकरणात पोलिसांवर दबाव व हस्तक्षेप असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे, ‘अण्णा’ नावाचा व्यक्ती पिंटू मुळे बसलेल्या पोलिस गाडीचा व तपास पथकाचा पाठलाग करीत होता, पोलिस उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी त्याला हकलून दिले हे त्यांनी स्वतः कबुल केले मात्र कारवाई शुन्य.. अश्या अनेक बाबी पोलिसांवर दबाव असल्याला पुष्टी देतात असे आमदार पाटील म्हणाले. लक्षवेधी उत्तर ‘लीक’ प्रकरणात सरकारने कारवाईचे आश्वासन दिले आहे त्यामुळे आमदार पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गणेश भातलवंडे यांच्याकडे जे उत्तर पाठवण्यात आले ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासाठी होते. भातलवंडे यांनी त्यांना आलेले उत्तराची पीडीएफ आमदार राणा यांना पाठवली आहे याची चौकशी करा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

ड्रग्ज तस्करीत अटक आरोपी विश्वनाथ पिंटू मुळे याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील. यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याचे फोटो समोर आले आहेत तर दुसरीकडे आमदार स्वतः म्हणतात की डिसेंबर महिन्यात ड्रग्ज तस्करी बाबत पहिली ठोस माहिती मिळाली, दुर्दैवाने 2 वेळेस ट्रॅप अपयशी ठरला मात्र तिसऱ्या वेळी यश आले. ड्रग्जचे सेवन करणारे अनेक जन त्यांच्यासोबत सावलीसारखे असत. टीप देणारा ‘खबऱ्या भाई’ हाही आमदार पाटील यांचा असल्याचे सांगितले जाते. सगळा डाव यांचा ? कोणता राग काढुन काय साध्य केले जाते ? एकदरीत चाललंय काय ? तपास काय असावा, कोणाला अटक करायचे हे सगळं ठरवून केले जात आहे का ? काही जणांना वाचवण्यासाठी काहीचा बळी दिला जात असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी करीत तपास एटीएस किंवा इतर तत्सम यंत्रणेकडे वर्ग करावा अशी मागणी केली आहे.
आमदार कैलास पाटील विधीमंडळात म्हणाले की, मी एक लक्षवेधी मांडली होती ती सभागृहाची संपत्ती आहे, ती अजुन चर्चेला आली नाही, संबंधित विभागाचे उत्तर मागितले होते मात्र त्यांचे उत्तर सरकारला येण्याआधी तालुक्याच्या ग्रुपवर व्हायरल झाले. सदस्यांना लक्षवेधी प्रश्नाची उत्तरे विधीमंडळात मिळत नाहीत, ती घ्यावी लागतात तिथे उत्तर लीक होते त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. शासनाने याची नोंद घ्यावी असे आदेश तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिले. लक्षवेधी कुठे लीक झाली हे पाहून कारवाई करा असे आदेश दिले. विभागाकडून लक्षवेधी खाली गेली असेल तर त्यावर कारवाई करू असे आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिले.
धाराशिव पोलिसांनी 3 वेळेस तुळजापूर येथून ड्रग्ज जप्त करीत 16 जणांना आरोपी केले त्यातील 10 जणांना अटक केली असुन 2 आरोपी फरार आहेत तर 4 जणांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत, 4 मार्च पासुन तपासात एकही नवीन नाव कागदावर निष्पन्न झाले नाही किंवा एकाही आरोपीला अटक नाही. 4 नावे गोपनीय असल्याचे पोलिसांनी 1 मार्चला कोर्टात सांगत डायरीत नावे नमुद केली, नावे गोपनीय ठेवण्यात पोलिसांना यश आले मात्र 20 दिवस उलटले तरी अटक नाही.