धाराशिव – समय सारथी
मुकुंद कसबे मृत्यू प्रकरणी आरोपींवर हत्येसह अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अन्यथा 15 ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कसबे यांच्या नातेवाईक यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. कसबे मृत्यू प्रकरणात 2 वेगवेगळ्या कहानी असुन पहिल्यादा अकस्मात मृत्यू तर त्यानंतर 14 महिन्यांनी तो अपघात असल्याचे नमुद करीत 2 गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणात विशेष पोलिस निरीक्षक यांनी लक्ष घातल्यावर त्याचा तपास ग्रामीण पोलिस ठाण्यातून आनंद नगर पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील मोहा येथील मुकुंद माधव कसबे यांचा येडशी येथे 21 मार्च 2024 रोजी मारहाणीत खून करण्यात आला आहे. कसबे हे येडशी येथील हॉटेल कालिका ढाबा येथे वेटरचे काम करीत होते. त्यांचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचा आरोपी नातेवाईक यांनी केला आहे. मुकुंद याला धाराशिव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मारहाण झाल्याचे सांगितले, तशी नोंद ऍडमिट केलेल्या वैद्यकीय कागदपत्रावर नमुद करण्यात आले आहे. त्याच्या कानातून आणि डोळ्यातून रक्त येत होते. त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याला मारहाण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे उजवा आणि डावा हात, खांद्यावर तसेच पिंडरीसह त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. त्यामुळे हा अपघात नसून मारहाणीतून झालेली हत्या आहे असा आरोप निवेदनात केला आहे.
कसबे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांना तिरस्कार व द्वेष भावनेने खून करण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली, त्यात त्यांचा जीव गेला. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी व खाजगी लोक गुंतलेले असून त्यांनी अकस्मात मृत्यू व त्यानंतर वर्षभराने अपघात दाखवत वेगवेगळे 2 गुन्हे नोंद केलेले आहेत. कसबे यांची बहीण सारिका दगडू मोरे यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन 100 रुपयांच्या बॉंडवर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या नावाने शपथपत्र लिहून घेतले आहे. त्या शपथपत्राशी काही संबंध नसल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात संबंधित दोषी आरोपीवर हत्येसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अट्रॉसिटी कायदा अंतर्गत दाखल करण्यात यावा. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे किंवा स्वतंत्र पथकाकडे वर्ग करण्यात येऊन न्याय मिळवून द्यावा. अन्यथा दि.१५ ऑगस्ट रोजी विविध संघटना एकत्र घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सारिका दगडू मोरे (बहिण) व पवन कोंडीबा कसबे (पुतणे) यांनी दिला आहे.