धाराशिव – समय सारथी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आक्रमक होते आंदोलन केले. आमदार राणा यांच्या प्रतिकात्मक फोटोला मराठा आंदोलकांनी जोडे मारले यावेळी कुत्र्याचा फोटोचे बॅनर बनवत त्याला जोडे मारले व निषेधाच्या घोषणा दिल्या. आमदार राणा यांनी मनोज जरांगे यांचा निषेध करीत फेसबुक लाईव्ह केले होते त्यानंतर त्यांना विरोध होत आहे. आजच दिवस काळा व दुर्दैवी असुन जरांगे यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या त्यामुळे त्याचा निषेध करीत जरांगे यांनी संयम व मर्यादा पाळाव्यात असे आमदार राणा म्हणाले होते.
मराठा आंदोलक म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आमदाराचा आम्ही निषेध करीत आहोत. एक योद्धा गरजवंत मराठा समाजासाठी लढत आहे याचा एक मुलगा परदेशात शिकायला आहे, दुसरा कारखानदारी करुन कोटीच्या गाडीत फिरतो आहे आणि इथे हे आमच्या समाजाबद्दल अपशब्द बोलतात, ही निंदनीय बाब आहे, इथून पुढे जरांगे विरोधात बोललात तर करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा इशारा दिला.
दिवसभरात जे घडले त्यामुळे काळा दिवस आहे, गरजवंत मराठासाठी लढणारा नेता ज्याप्रकारे बोलले ते दुर्दैवी असुन सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत जे बोलले असे सांगत आमदार राणा यांनी जरांगे यांचा निषेध केला. महाराष्ट्रात वेगळी संस्कृती असुन त्यात आपण वाढलो आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, जेव्हा राजकारण समाजकारणात असतो त्यावेळी प्रचंड संयम बाळगावा लागतो, मर्यादा पाळाव्या लागतात मात्र ज्या प्रकारे जरांगे बोलले ते अत्यंत दुर्दैवी निंदनिय होते.
फेसबुक लाईव्हनंतर मराठा समाज आमदार राणा यांच्या विरोधात आक्रमक झाला असुन इतके दिवस कुठे होतात, आताच का बोलायचं सुचलं असा प्रश्न केला आहे. शिवराळ व शेळक्या भाषेत मराठा समाजाच्या आंदोलकांनी कानटोचत आमदार राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दार, मराठा द्रोहीची उपमा देत मराठा विरोधी आमदाराला गावबंदी केली पाहिजे असा इशारा दिला. आमदारांच्या लाईव्हवर टिकेच्या पोस्टचा भडीमार झाला त्यानंतर त्यांनी कॉमेंट्स बंद केल्या.
मराठ्यांशी गद्दारी केली,लाठीचार्जवर बोलायला लाज वाटली. जरांगे पाटलांचा निषेध करताना समाजापेक्षा ते जवळचे वाटले. मराठ्यांशी गद्दारी महागात पडणार. काळा दिवस हा समाजासाठी नसून समाजा विरुद्ध गरळ ओकणाऱ्या आमदार खासदारांसाठी आहे. लाचारवीर, भावपूर्ण श्रद्धांजली.सगळेच आमदार खासदार दळभद्री, मराठाद्रोही आहेत. ईडीच्या भीतीने बोलला, आजपर्यंत नाही बोलला. जो पवारांचा, पक्षाचा झाला नाही तो समाजाचा काय होणार ? कशासाठी मंत्रीपदासाठी उठाठेव, फेसबुक पिंट्या अशी टीका केली गेली आहे.