धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी, गंगणे व नागरी सत्कार सोहळा या वादग्रस्त प्रकरणात भुमिका स्पष्ट करताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पत्रकारांची दिशाभुल केली. ड्रग्ज गुन्ह्यात पोलिसांनी कोर्टात सादर केलेले ‘शपथपत्र’ (ऍफिडेव्हिट) देतो असे आमदारांनी महसुल मंत्र्यासमोर सांगितले मात्र प्रत्यक्षात पत्रकार परिषदेत पोलिसांच्या तक्रारीचा ‘पुरवणी जबाब’ हाती देऊन नेहमीप्रमाणे ‘वाचा व अभ्यास’ करा असा सल्ला देण्याचा ‘छंद’ जोपासला.
शपथपत्र व जबाब या दोन्ही बाबी वेगळ्या असताना ‘पराकोटी’ ची ‘ज्ञानसंपदा’ असलेल्या आमदारांनी शब्दाचा ‘छळ’ करून एक प्रकारे पत्रकारांना ‘उल्लू’ बनविले. ‘पीक विमा’ नंतर ‘ड्रग्ज स्पेशालिस्ट’ अशी ओळख निर्माण केलेल्या त्यांच्याकडुन हा ‘शब्द भेद’ पत्रकारांना अपेक्षित नव्हता.
सर्वसाधारणपणे पोलिसांना सर्व माहिती असते मात्र ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडे ठोस माहिती उपलब्ध नव्हती, मी योग्य व्यक्तीमार्फत माहिती दिल्यानेच हे उघड झाले असा दावा आमदारांनी केला होता. ड्रग्ज सिंडीकेटचा चांगला अभ्यास झाल्याने, शिवाय कागदावर उत्तम ‘पीपीटी’ बनवण्याचा अंगीकृत ‘गुण’ असल्याने त्यांना सरकारने ‘मित्रा’च्या उपाध्यक्ष प्रमाणे ‘विशेष बाब’ म्हणुन ‘सहायक तपास अधिकारी’ म्हणुन नेमावे असे, खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा नागरी सत्कार केला. मंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारत स्तुतीसुमने उधळल्यानंतर टिकेची झोड उठत आहे. या प्रकारावर महसुल मंत्री बोलण्यास 3 वेळेस स्पष्ट नकार देत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यावर बोलतील असे म्हणत त्यांच्याकडे बोटं दाखवले. मंत्र्यांसमोर वेळ मारून नेण्यासाठी ऍफिडेव्हिट या ‘जड’ शब्दाचा वापर केल्याचे बोलले जात आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास सुरु असून 10 आरोपी फरार आहेत, अटक केलेल्या 14 आरोपींच्या अनुषंगाने 10 हजार 744 पानाचे दोषारोपपत्र 16 एप्रिल रोजी दाखल केले आहे, त्यानंतर 14 आरोपीना अटक केली. ड्रग्ज कसे आले, कोणी रुजविले व वाढवले, पाठबळ कोणाचे, आर्थिक लाभ कोणाला झाला, कांड कोण केले यासह अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलिस अद्याप ड्रग्ज रॅकेटच्या मुंबई कनेक्शन व अंतिम निष्कर्षांपर्यंत आलेले नाहीत, प्रत्येकाचा सहभाग अधोरेखित करणे आव्हान आहे.
आमदारांनी ‘शपथपत्र’ म्हणुन दिला हा ‘जबाब’ –
तामलवाडी पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या फिर्यादीवरून 14 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांनी कासार यांचा पुरवणी जबाब घेतला. तो जबाब आमदार पाटील यांनी पत्रकार यांना ‘शपथपत्र’ म्हणुन हातात दिला.
15 फेब्रुवारी जबाबानुसार ड्रग्ज कारवाईत गोपनीय बातमीदार म्हणुन विनोद पिटू गंगणे यांनी पोलिसांचे बातमीदार (खबरी) म्हणुन महत्वाची भुमिका बजावली. तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी गंगणे हे मदत करतील असे सांगितले त्यानुसार गंगणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी ड्रग्ज खरेदी विक्रीची माहिती दिली.व्यसन कसे लागले व व्यसनमुक्त होऊन कसे सुटले, व्यसनामुळे सामाजिक आर्थिक व कौटुंबिक अडचणीला सामोरे जावे लागले. तरुणांना या व्यसनाच्या बळी पडण्यापासुन रोखण्यासाठी ते पोलिसांना मदत करत असल्याचे सांगितले. काही नंबर व माहिती त्यांनी दिली त्यानंतर 2 फेब्रुवारीला सापळा लावला मात्र संशय आल्याने मोबाईल स्विच ऑफ करून संशयित पळून गेल्याने तो अपयशी ठरला. 14 फेब्रुवारीला 3 आरोपीसह ड्रग्ज रंगेहात पकडण्यात आले. गंगणे यांचे चॅट असलेले 3 स्क्रीनशॉट जबाबासोबत जोडले.
कोर्टात काय काय घडले –
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन 28 जन तस्कर गटात तर 10 जण सेवन गटात आहेत, त्यात दोषारोप पत्रानुसार गंगणे हे सेवन गटातील आरोपी आहेत. त्यांना 7 जुनला अटक करण्यात आली, 6 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर 12 जुनला न्यायालयीन कोठडीत धाराशिव जेलमध्ये रवानगी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने 10 जुलैला काही अटींवर सशर्त जामीन मंजुर केला आहे.