धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील किशोरवयीन व तरुण मुलात नशेबाजीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कळंब शहरातील 2 जणांचा नशेबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन ते खुलेआम एका स्वच्छता गृहाच्या दारात घाणीत बसून व्हाईटनरची नशा करीत आहेत. यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात येते, नशेबाजीच्या वाढत्या प्रमाणामुळे पालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. धाराशिवमध्ये नशा व अमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी पथक स्थापन करण्याची मागणी होत आहे.
कळंब नगरपरिषद परिसरातील एका स्वच्छतागृहाजवळ दोन किशोरवयीन मुले प्लास्टिक पिशवीत व्हाईटनर शिंपडून त्याचा वास घेताना दिसत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा प्रकार पाहता नशेच्या नवीन आणि धोकादायक पद्धती रुजत चालल्याचं दिसत आहे. व्हाईटनर, सुलोचन, फेव्हिकोल, झोपेची गोळी, वेदनाशामक औषधे, नेल पॉलिश रिमूव्हर, गोंद यासारखी सहज मिळणारी साहित्ये आता नशेसाठी वापरली जात असल्याचे समोर येत आहे. नशेबाजीतुन गुन्हेगारी प्रवृत्ती व गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे.
पालकांनी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलांचे वागणे, त्यांच्या संगतीकडे लक्ष देणे, सतत संवाद साधणे आणि शाळा-कॉलेज पातळीवर व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. नशा आता केवळ बड्या शहरापुरती मर्यादित राहिलेली नसून, ग्रामीण व तालुकास्तरावरही ही समस्या पसरत चालल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.