धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत दिवसेंदिवस आरोपींच्या संख्येत वाढ होत आहे, पोलिस तपासात ड्रग्ज तस्करीत आणखी एक आरोपी निष्पन्न झाला आहे, पोलिसांनी राहुल कदम – परमेश्वर याला अटक केली आहे. पुणे व सोलापूर येथील 2 आरोपीना तपासाअंती अटक केल्यानंतर पोलिसांना हा 19 वा आरोपी निष्पन्न झाला होता. तुळजापूर ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 19 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 10 जण जेलमध्ये आहेत, 2 आरोपी फरार आहेत, 4 नावे गोपनीय असुन 2 आरोपी 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत तर 1 जण अटकेत आहे. आगामी काळात तपासात आरोपीच्या संख्येत वाढ होऊ शकते. एखाद्या एमडी ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने आरोपी निष्पन्न होण्याची ही राज्यातील एकमेव केस असावी, यात धाराशिव पोलिसांचे मोठे यश आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम , उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत. ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 16 वरून 19 झाली आहे, त्यातील सुल्तान उर्फ टिपू शेख व जीवन साळुंके हे 2 जण पोलिसांच्या कोठडीत, 10 जण जेलमध्ये आहेत तर तुळजापूर येथील पिनू तेलंग व मुंबई येथील वैभव गोळे हे 2 जण फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवत ती डायरीत नमुद केली आहेत, त्या 4 आरोपीच्या मागावर पोलिस आहेत.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. यातील अरगडे, दळवी, राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे हे 10 जण जेलमध्ये आहेत. स्वराज उर्फ पिंटू तेलंग, वैभव मुळे हे 2 आरोपी फरार आहेत.सुल्तान उर्फ टिपू शेख व जीवन साळुंके हे 2 जण पोलिसांच्या कोठडीत आहेत तर राहुल कदम परमेश्वर अटकेत आहे.