4 किलो सोन्यासह करोडोचा मुद्देमाल लुटला – 5 जणांनी पिस्टल दाखवून टाकला होता दरोडा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले असुन पोलिसांनी मुंबई येथून 2 आरोपीना अटक केली आहे. आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली असुन या दरोड्यात लुटलेले तब्बल 4 किलो सोने त्यांनी काही सरफा व्यापारी यांना विकले असुन ते हस्तगत करण्यासाठी अधिक तपास सुरु आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने ही कारवाई केली. दरोड्याचा उलगडा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.सर्व ताकत लावत पोलिसांनी गुन्हा निष्पन्न केला.
धाराशिव शहरातील मुख्य भागातील सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती बँक लुटून आरोपीनी तब्बल 4 किलो 120 ग्राम सोन्यासह 1 लाख 40 हजार रुपये दोन मोबाईल सहा हजार रुपये असा 1 कोटी 87 लाख 14 हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेला होता. 5 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असुन त्यापैकी 3 जणांच्या हातात पिस्टल होते, विशेष म्हणजे त्यांनी चेहरा न झाकता दरोडा टाकला असुन ते सर्वजण 5 सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते त्यातील 2 जणांना अटक केली आहेत.
कॅशियर सतीश अनिरुद्ध फुटाणे यांनी फिर्याद दिली असुन अज्ञात 5 दरोडेखोरांवर कलम 395 नुसार गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तक्रार नोंद केली असुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे हे करीत आहेत.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ तपासाला सुरुवात केली, डॉग स्कॉड श्वान पथक तिथे आले. फिंगर प्रिंट तज्ज्ञ यांनी हाताचे ठसे व इतर तांत्रिक पुरावे घेत तपासणी केली. आरोपी यांनी मास्क न लावता चेहरे उघड ठेवत धाडसी दरोडा टाकला त्यामुळे बाजारपेठ व नागरिकांत खळबळ उडाली होती. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेचे वासुदेव मोरे, शहरचे उस्मान शेख, आनंदनगर ठाण्याचे प्रवीणकुमार बांगर यांनी भेट देत तपास केला, या सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आहे.