धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यावर अभुतपुर्व संकट कोसळले आहे. अशा वेळी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानातून कर्ज वसुली बंद करण्यात यावी. तसेच खात्यांवर लावण्यात आलेले होल्ड तत्काळ हटविण्यात यावेत असे आदेश अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी दिले आहेत. सर्व बँकांना तसे निर्देश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्र दिले होते.
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली न करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापकांनी तातडीने वरील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्व बँकांची ऑनलाइन मीटिंग घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठक घेऊन बँकांना तसे निर्देश दिले होते. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे. घरात धान्य नाही, गुरांना चारा नाही, शेतात उभे पिक उरले नाही, अशी बिकट अवस्था शेतकरी बांधवांच्या वाट्याला आली आहे.
अशा विदारक परिस्थितीतही बँका शेतकऱ्यांच्या खात्यांवर होल्ड लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर जमा होणारे सरकारी अनुदान, मदत रक्कम, घरकुल योजना निधी किंवा इतर शासकीय योजनांचे पैसे ते काढू शकत नाहीत. त्यांच्या खात्यावरील रक्कम त्यांच्यासाठी जीवनावश्यक खर्च भागवण्याचा एकमेव आधार आहे. या अनुषंगाने बँकांची बैठक घेऊन त्यांना आदेश द्यावेत, अशी सूचना आपण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली होती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील सर्व होल्ड हटवावेत, कर्जवसुली करू नये, कर्जाचे पुनर्गठन करावे, सर्व शासकीय अनुदान व मदतीची रक्कम होल्ड न लावता थेट शेतकऱ्यांना, नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, असे आदेश आता अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना दिले आहेत.