धाराशिव – समय सारथी
ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडितास मिळणाऱ्या शासकीय अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समाजकल्याण कार्यालय, धाराशिव येथील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. रमेश मालू वाघमारे (वय ३७, पद – कनिष्ठ लिपिक, वर्ग-३, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, धाराशिव असे आरोपीचे नाव आहे.
ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी 20 हजार रुपये, तर कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी 5 हजार लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4, 7 व 11 डिसेंबर रोजी पडताळणी केली. या दरम्यान समाजकल्याण कार्यालयात झालेल्या पडताळणीत कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले नसले, तरी कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी पंचांसमक्ष 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
पडताळणीत तक्रार खरी आढळल्याने एसीबीने 11 व 12 डिसेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीस संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार देत भेट घेणे टाळले. अखेर आज 31 डिसेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे (ला.प्र.वि. धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी पर्यवेक्षण केले. संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले. विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी, शशिकांत हजारे यांचा पथकात समावेश आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितली जात असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.











