धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदीर ट्रस्टच्या वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे याच्या घरून घरझडतीमध्ये तब्बल 6 लाख पेक्षा जास्त रक्कम व जवळपास पाव किलो सोने लाचलुचपत विभागाला सापडले आहे. 6 लाख लाचेच्या व्यतिरिक्त आणखी 6 लाख व सोने सापडले असुन ही रक्कम शिंदे याने घरात अडगळी ठिकाणी लपून ठेवली होती. 10 लाख रुपये लाचेची मागणी करुन 6 लाख घेताना शिंदेला अटक केली होती, त्याला आज धाराशिव येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थान अंतर्गत सैनिक स्कुलच्या शाळेचे वॉल कंपाउंड व इतर कामाचे 3 कोटी रुपयांचे शासकीय बिल काढण्यासाठी लाच घेतली.
तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 3 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. सदर बांधकामाचे 90 % काम पुर्ण झाले आहे. सदर बांधकामाचे आत्तापर्यंत 2 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34 लाख 60 हजार 579 ही परत मिळवून देण्यासाठी आलोसे याने पंचासमक्ष 10 लाख रुपये, लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 6 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य करुन पंचासमक्ष 6 लाख लाच रक्कम स्विकारताना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन तुळजापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील यांचा समावेश होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.