धाराशिव – समय सारथी
बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला 7 वर्षाची शिक्षा व 50 हजार रुपयांचा दंड प्रमुख व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी सुनावला आहे. शंकर विश्वनाथ महाजन असे शाखा अभियंत्याचे नाव असुन त्यांना 2015 साली लाच घेताना पकडले होते. धाराशीव शहर पोलिसात कलम 7, 13(1)(ड) सह 13(2) ला.प्र. अधिनियम, सन 1988 अन्वये गुन्हा नोंद झाला होता. महाजन यांनी 12 हजार रुपयांची मागणी करुन 10 हजार लाच स्वीकारली होती.
तक्रारदार हे गुत्तेदार असुन त्यांनी धाराशीव ते गडदेवधरी या तयार केलेल्या रस्त्याच्या कामाचे मोजमाप पुस्तीकेवर सहया करणेसाठी महाजन यांनी पंचासमक्ष एकुण बिलाचे 3 टक्के रक्कम म्हणजे 12 हजार रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 10 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले.तपासी अधिकारी अश्विनी भोसले, तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांनी ही कारवाई केली होती. सरकारी अभियोक्ता पी के जाधव यांनी सरकारच्या वतीने बाजु मांडली. पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पैरवी कर्मचारी पो ह/ 1043 ए. एस. मारकड पो.शी/960 जे. ए. काझी, ला.प्र. वि. धाराशिव यांनी काम पाहिले.
महाजन यांना कलम 7 अन्वये 4 वर्ष कारावास व 50 हजार दंड, दंड न भरल्यास 3 महिने कारावास तर कलम 13(1)(ड), 13 (2) अन्वये 7 वर्ष कारावास व 50 हजार दंड, दंड न भरल्यास 03 महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.