धाराशिव – समय सारथी
सणासुदीच्या व सुट्टीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी तिकीट दर वाढविण्यासंबंधी छावा संघटनेने आवाज उठवला असुन जिल्हाप्रमुख ऍड राकेश पवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करीत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
सणासुदीच्या व सार्वजनिक सुट्टीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारतात. हे पूर्णपणे अन्यायकारक असून सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. महाराष्ट्र मोटर वाहन कायदा व आरटीओ यांनी ठरवलेले अधिकृत दर न पाळता अवाजवी दर आकारले जात आहेत. यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी असून सार्वजनिक भावना दुखावल्या जात आहेत.
सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करावी. अधिकृत भाडे दरांची यादी सर्व बसस्थानकांवर, आरटीओ कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. विशेष तपासणी पथक नेमून अवाजवी दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरुद्ध कार्यवाही सुनिश्चित करावी अशी मागणी केली.
प्रवाशांना तक्रार नोंदविण्यासाठी आरटीओ हेल्पलाईन सक्रिय ठेवावी व तक्रारींवर तातडीने कारवाई करावी. काही ट्रॅव्हल्स व्यावसायिक परमिटशिवाय वाहन चालवत आहेत, जे कायद्यानुसार अवैध आहे. काही ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून कायद्यापेक्षा जास्त तिकीट शुल्क आकारत आहेत, जे आर्थिक शोषण मानले जाते. वाहनांची फिटनेस, विमा आणि ड्रायव्हर लायसन्स यांचे पालन होत नाही.या मागण्या केल्या असुन मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.