धाराशिव – समय सारथी
कृष्णा पुर नियंत्रण प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने दिला असुन हा प्रकल्प झाल्यावर कोल्हापूर व सांगली येथील पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथे आणणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याचा विषय गंभीरपणे घेतला असुन यामुळे कोल्हापूर सांगली भागातील पुर नियंत्रण व पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातील दुष्काळ मुक्ती असा दोन्ही हेतु साध्य होईल असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले.
या प्रकल्पाची 126 किमी लांबी असणार असुन आशिया खंडातील 93 किमी बोगदा केला जाणार आहे. 33 किमी कालवा बनवण्यात येणार असुन 12 मीटर रुंदी असणार आहे. काही ठिकाणी बंद पाईप लाईन द्वारे हे पाणी आणण्यात येणार आहे. 15 हजार कोटी रुपये अंदाजे प्रकल्पची किंमत असणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे योगदान मिळाले. मे पासून दर महिन्याला एक अशी बैठक झाली, विखे पाटील यांच्यासमोर अहवाल मांडून त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या मंजुरीने मंत्रीमंडळ बैठकीत मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. धाराशिवकरांच्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांचे आभार मानले.
कृष्णा पुर नियंत्रण योजना सांगली कोल्हापूर येथे पाऊस जास्त असताना 90 दिवस चालणार आहे. सातारा जिल्ह्यातील टेम्भू धरणातुन उजनी धरणात पाणी आले की त्यानंतर जिथे लागेल तिथे हे पाणी नेले जाणार आहे. 50 टीएमसीपैकी अंदाजे 16 टीएमसी पेक्षा अधिक पाणी धाराशिव जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा असल्याचे आमदार पाटील म्हणाले. हा प्रकल्प झाल्यास 3.5 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे असे ते म्हणाले. या योजनेला मंजुरी मिळाल्यावर प्रकल्प अहवाल, आर्थिक तरतूद कोठून करायची याचे नियोजन केले जाणार आहे.