धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात 294 मतदार केंद्रावर बोगस आधार कार्ड,नंबर व कागदपत्रे वापरून मतदार नोंदणी अर्ज केल्याचे समोर आले असुन त्या मतदार केंद्र व बोगस अर्जाची माहिती असलेला अहवाल धाराशिव जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राज्याचे निवडणूक आयुक्ताकडे पाठवला आहे. त्या अहवाल अनेक धक्कादायक बाबी नमूद असुन निवडणुक विभागाने बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न कसा हाणून पाडला हे तपशीलवार नमूद केले आहे.
संघटित गुन्हेगारी कटाचा हा भाग असुन तोतयेगिरी व भारतीय निवडणुक आयोगाची फसवणूक झाल्याचे म्हणटले आहे. निवडणूक आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, राज्यात अनेक ठिकाणी प्रयत्न झाले मात्र ते आयोगाने हाणून पाडले, धाराशिव येथे राज्यातील अश्या स्वरूपाचा एकमेव पहिला गुन्हा नोंद झाला आहे.
तब्बल 6 हजार 95 बोगस मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले, वेळीच तोतयेगिरी लक्षात आल्यानंतर निवडणुक विभागाने हे अर्ज नामंजूर करीत पोलिसात निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. निवडणुक विभागाने सर्व कागदपत्रे, पुरावे पोलिसांना तपासासाठी दिले आहेत.
फोटो एक मात्र नाव व आधार क्रमांक वेगवेगळे वापरण्यात आले आहेत. एक मुलीचा फोटो एकच आहे मात्र एका आधार कार्डवर छाया सुनील पवार, बेंबळी गावचा पत्ता तर दुसऱ्यावर पुनम चव्हाण आरळी खुर्द तुळजापूर येथील पत्ता आहे. हा दोन्ही आधार कार्डचे नंबर वेगवेगळे असले तरी एनरोल नामांकन नंबर हा 4892/89659/414 हा सारखाच आहे. हाच एनरोल नंबर जवळपास हजारो आधार क्रमांक यांना वापरला आहे. आधार नंबर वेगवेगळे असुन ते अस्तित्वात नाहीत. सर्व आधार कार्डवरील दिनांक 23 मे 2019 असुन डाउनलोड व जारी केलेली दिनांक एकच आहे.
2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात ‘व्होटर हेल्पलाईन’ या अँपच्या माध्यमातुन जवळपास 6 हजार 95 पेक्षा अधिकची नावे फॉर्म नंबर 6 भरून नाव नोंदणी करण्यात आली. एका लॉगिनवरून जास्तीत जास्त 5 अर्ज ऑनलाईन भरता येतात म्हणजे जवळपास दीड हजार सिमकार्ड वापरण्यात आले आहेत त्यामुळे हे काम ‘ऑरगनाईझड पद्धतीने करण्यात आले आहे. चावडी वाचनमध्ये 294 मतदान केंद्रावर बोगस अर्ज नोंदणी करण्यात आली आहे.
तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 172,3(5),318(2),335,336(2),336(3),340(2)61(2) व 62 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास गेली 10 महिन्यात लागला नाही. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राज्य निवडणुक आयोगाला लेखी अहवाल पाठवला असुन त्यात पोलिस तपास करीत असल्याचे म्हणत पोलिसांकडे ‘बोट’ दाखवले आहे.