धाराशिव – समय सारथी
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुप्त वार्ता विभागाने धाराशिव जिल्ह्यातील 4 दुकानांवर मोठी कारवाई करीत असुरक्षित व अप्रमाणित खाद्यतेलाचा 65 लाख 52 हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे, 47 हजार 685 किलो खाद्यतेल जप्त केले असुन या तेलाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.अहवाल तेल हानिकारक असल्याचा आल्यास खटला दाखल करून तेल नष्ट करण्यात येईल अशी माहिती सहायक आयुक्त प्रदीप कुटे यांनी दिली.
धाराशिव येथील सिद्धेश्वर किराणा भांडार येथील धाडीत 248 किलो सोयाबीन तेल, 2 हजार 188 किलो पामतेल जप्त करण्यात आले. धाराशिव येथील मदनलाल शामसुंदर बांगड यांच्या दुकानातून 882.4 किलो पामतेल, 21 हजार 998 किलो किलो रिफाइंड पामोलिन तेल, 3 लाख 99 हजार 744 रुपयांचे लूज सूर्यफूल तेल, 17 हजार 998 किलो सोयाबीन तेल जप्त केले.
कळंब शहरातील बिरदीचंद हरकचंद बलाई दुकानातून 98 किलो सूर्यफूल, 148 किलो पामोलिन, 998 किलो सोयाबीन तेल जप्त केले. उमरगा येथील शुभम इंटरप्राईजेस येथून 628 किलो सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. आगामी काळात अशी कारवाई सुरु राहणार आहे, नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा कुटे यांनी दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यात सणासुदीत भेसळयुक्त, अप्रमाणित खाद्यतेल विक्रीची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुप्त वार्ता विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 21 ऑगस्टपर्यंत धाराशिवसह कळंब व उमरगा येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत 65 लाख 52 हजार रुपयांचे 47 हजार 685 किलो खाद्यतेल प्रमाणित नसल्याचे आढळून आले आहे. जप्त तेलाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालात तेल मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचे निश्चित झाल्यास दोषींवर अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.