परिवहन मंत्र्याच्या जिल्ह्यात ‘हिम्मत’ कोणाची – भाविकांना त्रास देणारी ‘टोळी’ किंमत चुकवणार?
धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या जिल्ह्यात तामलवाडी टोल नाक्यावर भाविकांच्या वाहनाकडून इतके दिवस ‘वसुली’ कोण करीत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘ती’ वाहने आरटीओ विभागाची नाहीत असे स्पष्टीकरण विभागाने माहिती विभागामार्फत दिले आहे. स्वच्छ प्रतिमा असलेल्या परिवहन मंत्र्यांच्या जिल्ह्यात वसुलीची ‘हिम्मत’ कोण करत होते, त्याला आगामी काळात ‘किंमत’ चुकवावी लागणार आहे.
तामलवाडीसह अन्य ठिकाणी भाविक, प्रवाशी यांच्या गाड्या अडवून मोठ्या प्रमाणात वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. आरटीओची वाहने नव्हती तर ती वसुली कोण करीत होते, कोणती ‘टोळी’ सक्रिय होती. वायुवेग वाहनाचे मागील वर्षभराचे रेकॉर्ड, लोकेशन, कामगिरी या निमित्ताने समोर येणे गरजेचे आहे. तामलवाडी टोल नाक्याच्या हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे आहे, त्यांच्या नजरेत ही टोळी आली नाही का? या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.
तुळजापूर तालुक्यातून जाणारा धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी येथे टोलनाका आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे एकूण चार फिरते वायूवेग पथके कार्यरत आहे.ही वायूवेग पथकाची वाहने एका ठिकाणी न थांबता पूर्ण जिल्ह्यात वाहनांची तपासणी करतात.तामलवाडी येथे वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयातील वायूवेग पथकाची वाहने कायमस्वरूपी स्वरूपी उभी राहत नाही.त्याचप्रमाणे तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आरटीओ विभागाकडून त्रास दिला जात नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली.