मविआने अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी करत दिला आंदोलनाचा इशारा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा चौक या मार्गावरील रस्त्याच्या मलमपट्टीचा पावसानेच पंचनामा केल्यामुळे ठेकेदाराच्या बोगसगिरीचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी कायम असून एकाचा बळी आणि अनेक जायबंदी झाल्यावर देखील जाग न आलेल्या प्रशासनाच्या विरोधात महविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे रस्त्याच्या बोगस मलमपट्टीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा चौक या मार्गाची बेहद दुर्दशा झालेली आहे. याच मार्गावर शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठ असल्यामुळे हा रस्ता कायम वर्दळीचा आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी एका युवा उद्योजकाचा दुचाकी खड्डयात अडकून दुर्दैवी अंत झाला. तर याच मार्गावर अनेक जण जायबंदी झाले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ रस्त्याची कामे करून जनतेची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या मार्गावरील खड्डयात डबर आणि त्यावर मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु खड्डयात सिमेंट काँक्रिट किंवा इतर कोणत्याही मजबूत साहित्याचा वापर न केल्याने पावसाने खड्डे पुन्हा कायम आहेत.सदरील खड्डे हे सिमेंट काँक्रीट किंवा डांबरीकरणाने बुजवण्यात यावेअशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे
पुन्हा जीवितहानी होऊ नये यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी एमएसआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खड्डे बुजविण्याच्या बोगस कामाचा पंचनामा केला. या बोगस कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित बागल, युवा सेना शहरप्रमुख अभिराज कदम, सुमित बागल, अमित उंबरे, शिवराज आचार्य, मनोज उंबरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.