खासदार ओमराजे यांची केंद्र व राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार, 6 हजार बोगस मतदार नोंदणी अर्ज
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस आधारकार्ड, मोबाईल नंबर आधारे 6 हजार पेक्षा अधिक नव मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले. बोगस मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचे चावडी वाचन करून हाणून पाडला. खुद्द निवडणुक आयोगाने फसवणूक व तोतयेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून 10 महिने उलटले तरी तपास न झाल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. ओमराजे यांनी केंद्रीय व राज्य निवडणुक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असुन दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. पोलिसांवर दबाव असुन आयोगालाच न्याय मिळेना असे म्हणाले लागेल, या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी 476/ 2024 ला बोगस आधार कार्ड, फोटो, नावे व कागदपत्रे जोडून बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील 100 मतदार केंद्रावरचा प्रकार मतदार याद्याच्या चावडी वाचनात उघड झाला असुन तब्बल 6 हजार 200 पेक्षा अधिक अर्ज सापडले.
राजकीय दबावाखाली कोणत्याही आरोपीवर अद्याप कारवाई केली नाही, पोलिस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार आहे की नाही याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी. मी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे निवडणूक आयुक्त यांना तक्रार केली असुन या प्रकरणात झालेली जाणीवपुर्वक दिरंगाई निदर्शनास आणून दिलेली आहे.
‘व्होटर हेल्पलाईन’ या अँपच्या माध्यमातुन जवळपास 6 हजार 200 पेक्षा अधिकची नावे फॉर्म नंबर 6 भरून नाव नोंदणी करण्यात आली मात्र त्यातील बोगसपणा उघड झाल्यावर हे अर्ज नाकारण्यात आले. शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला तर दैनिक समय सारथीने पाठपुरावा केल्यानंतर व्याप्ती लक्षात घेऊन आयोगाने गुन्हा नोंद केला. 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात व्होटर अँपचा वापर करून मोठ्या प्रमाणात मतदार नाव नोंदणी करण्यासाठी अर्जाची नोंदणी करण्यात आली.
एका लॉगिनवरून जास्तीत जास्त 5 अर्ज ऑनलाईन भरता येतात म्हणजे जवळपास दीड हजार सिमकार्ड वापरण्यात आले त्यातुन एकाही व्यक्तीपर्यंत पोलिसांना पोहचता आले नाही. जवळपास 100 मतदार केंद्रावर हे ‘कांड’ झाले असुन कनेक्शन सेम आहे. आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सर्वत्र वापरले गेले. आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी,ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला होता.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा गावातील बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 172,3(5),318(2),335,336(2),336(3),340(2)61(2) व 62 अन्वये गुन्हा नोंद करून तो तपासासाठी तुळजापूर पोलीसाकडे वर्ग करण्यात आला.