खरं खोटं कोण ? ‘तो’ अहवाल सार्वजनिक करा – पुजारी मंडळाची मागणी – अहवालच आला नाही, जिल्हाधिकारी
धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदीराचा कळस उतरवण्यावरून भारतीय पुरातत्त्व विभागातील तीन अधिकाऱ्यांत मतभिन्नता असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतीय पुरातत्व विभागाचा याबाबतचा अधिकृत अहवाल राज्य पुरातत्त्व विभागास मिळाला नाही मात्र अहवालातील नकारात्मकता व नकारात्मक शेऱ्यामुळे पुन्हा नवा अहवाल मागविण्यात आला आहे त्यातूनच यात आयआयटीसह अन्य तज्ज्ञ लोकांच्या समितीची ‘एन्ट्री’ झाल्याचे बोलले जात आहे. आयआयटीच्या तंत्रज्ञ व्यक्तींना नव्याने सामावून घेऊन 1 महिन्यात अहवाल देण्यास मंत्री शेलार यांनी सांगितले आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये दावा केला होता की जीर्णोद्धार काम सुरु असुन मंदीर शिखर कळसासकट उतरावे लागणार आहे, तसा अहवाल आलेला आहे पण आपण पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व विभागाकडून अहवाल घेत आहोत, येत्या 15 दिवसात स्पष्ट होईल की मंदीर कळस उतरवायचा किंवा कसे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दावा केलेला तो अहवाल अद्याप समोर आलेला नाही. तो अहवाल सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, कळस बाबत पुरातत्व विभागाकडून कोणताही अहवाल किंवा पत्र प्राप्त झाले नाही. या सगळ्या प्रकारामुळे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी यात नेमक खरं आणि खोटं कोणाचं हे समोर येणे गरजेचे आहे. अहवाल बाबत गोपनीयता बाळगली जात असल्याने संभ्रम वाढला आहे. अपेक्षित गोष्टी साध्या होईपर्यंत खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागातील नागपूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिरास भेट दिली. या तिन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचे मत वरिष्ठांकडे नोंदवले आहे. मात्र लेखी अहवाल सादर न करता कळविलेल्या सूचनांच्या आधारे मंदिराचा कळस काढावा की नाही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यावर ‘मंथन’ होणार आहे. मंदिराच्या कळसाबाबत व सुरू असणाऱ्या कामावर छत्रपती संभाजी महाराज यांनी आक्षेप घेतले होते.भारतीय पुरातत्त्व विभागातील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हवाल्याने कळस उतरविण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
राज्य व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय अहवाल दिले, या प्रश्नावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मौन बाळगल्याचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे व अमरराजे कदम यांनी सांगितले. अनेक अहवाल मिळत नसल्याची तक्रार पुजारी मंडळानी मंत्र्याकडे केली. जे अहवाल व पत्र आले आहेत ते व झालेले पत्रव्यवहार पुजारी मंडळाला द्यावे व भाविकात सार्वजनिक करावे अशी मागणी केली आहे.
“महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियम, 1960” अंतर्गत तुळजाभवानी मंदीर हे राज्य संरक्षित मंदीर आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यावर अपेक्षित निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे कळते.