धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तुळजापूर येथे 108 फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असलेल्या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित असणार आहे. भवानी तलवार देताना तुळजाभवानी मुर्ती द्विभुजा की अष्टभुजा हे यानंतर ठरणार आहे. शिल्पकार यांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची माहिती नवरात्र उत्सवात मांडण्यात येणाऱ्या भवानी तलवार अलंकार पूजेची माहिती देण्यात आली नाही, देवीचे या रुपातील अलंकार पुजेचे रूप सर्व भक्तांच्या मनात सर्वमान्य आहे.
या शिल्पाच्या फायबर मॉडेल सादरीकरणाला मुदतवाढ देण्यात आली असुन 15 सप्टेंबर पर्यंत मॉडेल पाठवता येणार आहेत.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने कलारसिक शिल्पकारांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
शिल्पाच्या मूळ आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली 2.5 ते 3 फूट उंचीच्या फायबर मॉडेल्स मागविण्यात आली आहेत.हे मॉडेल्स तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्पकलेतील पदवी अथवा पदविका तसेच किमान 15 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे. मूळत: फायबर मॉडेल्स सादर करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी होती. मात्र,शिल्पकारांच्या सोयीसाठी आणि अधिक गुणवत्तापूर्ण मॉडेल्स सादर व्हावीत या उद्देशाने या कालावधीस वाढ देऊन अंतिम तारीख 15 सप्टेंबर 25 अशी निश्चित करण्यात आली आहे.
तयार झालेल्या फायबर मॉडेल्सपैकी निवड समितीद्वारे एकूण 5 मॉडेल्सची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या प्रत्येक मॉडेल सादरकर्त्याला 1.5 लाख रुपये मानधन दिले जाईल,तर अंतिम निवड झालेल्या मॉडेल सादरकर्त्याला 10 लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.हे मॉडेल्स तयार करताना इतिहास व धार्मिक संदर्भांचा विचार करणे बंधनकारक असून,त्यासाठी शिल्पकारांनी इतिहासकार तसेच पुरातत्व विभागाने उपलब्ध करून दिलेले संदर्भ अभ्यासणे आवश्यक आहे.
सदर फायबर मॉडेल्स कला संचालक,कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत.या संपूर्ण प्रक्रियेचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव तसेच अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्याकडे राहतील. या उपक्रमासंदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत