धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर शिखर /कळस बाबत तज्ञाची समिती गठीत करण्यात आली असुन या समितीने 30 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. मंदिर पूर्णपणे न उतरवता जतन व जीर्णोद्धार करावा यावर त्यांचा भर दिसून आला, जतन करण्यासाठी काही करता येते का हे प्राधान्याने पाहावे, पर्याय तपासावे असे शेलार म्हणाले. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारबाबत शेलार यांनी मुंबईत बैठक घेतली.
तुळजाभवानीच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात असुन त्याचा शोध घ्यावा या मागणीसाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बैठक घेण्याची मागणी केली होती, त्यानुसार ही बैठक झाली, या एकतर्फी बैठकीत षडयंत्र बाबत काय चर्चा झाली याचा तपशील कळला नाही, अनेक अहवाल मिळत नसल्याची तक्रार पुजारी मंडळानी मंत्र्याकडे केली.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 21 वर्षापूर्वी मांडलेल्या संकल्प प्रकल्पाला प्रचंड विरोध, षडयंत्र रचले जात असुन त्या संकटातही ते मार्गक्रमण करीत चिकाटीने काम करीत आहेत, हा समस्या वजा संदेश व जाणीव पक्षश्रेष्टी करून देण्यात ते यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीला पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 2 मठाना निमंत्रण नव्हते. कथित षडयंत्रकारी गटात कोण आहे हे त्यांनी समोर आणले नाही.
श्री तुळजाभवानी मंदिर व संकुल जतन संवर्धन व विकास आराखडा या संदर्भात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे मंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेतली, यावेळी गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर असल्याने मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय ( भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आयआयटी तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरले. या टीमने संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावा, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री शेलार यांनी दिल्या.
कुलस्वामिनीचे हे परंपरागत, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जाईल. संवाद आणि समन्वयातून या विषयावर निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने पुढील दिशा ठरविली जाईल अशी भुमिका त्यांनी स्पष्ट केली.
या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच मंदिराचे महंत तुकोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर कदम, विपीन शिंदे, ऍड शिरीष कुलकर्णी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.