धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही.भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारी नंतर मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिली होती मात्र खासदार व 2 आमदार या विरोधकांना एक दमडी सुद्धा विकास निधी द्यायची नाही असा त्यांचा ‘हट्ट’ असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 30-30-40 ज्यात विरोधकांना ठेंगा व 35-35-30 ज्यात तिघांत 30 टक्के असे 2 फॉर्मुले मांडले गेले आहेत.
भाजपचे स्थानिकचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही सुचना वजा तक्रारी केल्या होत्या. त्या सूचनाचा शेवटी मी पालकमंत्री म्हणून विचार करणे गरजेचे आहे. मला सत्ताधारी व विरोधक यांना सुद्धा सोबत घेऊन जायचे आहे, पुढे घेऊन जात असताना सर्वसामान्य धाराशिवकर जनतेचे नुकसान होऊ नये यासाठी सगळा विचार करून लवकरच नवीन यादी तयार करून महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामे करू असा विश्वास पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिल्यानंतर कामे थांबली होती मात्र स्थगिती उठवल्याचे पत्र राज्य सरकारने देणे गरजेचे होते. जो पर्यंत हे स्थगिती उठवल्याचे पत्र येत नाही तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेता येत नाही त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणारी बैठक रद्द करण्यात आली, लवकरात लवकर आम्ही जिल्हा नियोजन समितीची बैठक लावू असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन 4 महिने झाले असून 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी 457 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळालेली आहे मात्र नियोजन करणे बाकी आहे.