धाराशिव – समय सारथी
शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध कायम असून धाराशिव तालुक्यातील चिखली या गावात मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी दम दिला. मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी यांनी आपली जमीन मोजू नका असे म्हणत परत पाठवून दिले. धाराशिव जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरून या मार्गाचा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून विरोध करीत आहेत.
शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार आहेत. या जमिनीवर त्यांची उपजीविका अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामध्ये धाराशिव जिल्ह्यासह 12 जिल्हे समाविष्ट आहेत, यात वर्धा,यवतमाळ,हिंगोली,नांदेड,परभणी,बीड,लातूर,सोलापूर, सांगली,कोल्हापूर व सिंधुदुर्ग आहेत.
हा महामार्ग महाराष्ट्रातील तीन प्रमुख शक्तीपीठांना जोडणार आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी. तसेच, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांनाही हा महामार्ग जोडेल. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, आणि सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्रांनाही हा महामार्ग जोडणार आहे.